युद्ध म्हणजे काय? युद्धामुळे काय सिद्ध होते? हे सगळे प्रश्न सतत माझ्या मनात घुटमळत असतात. काही लोकांना अथवा देशांना वाटते की सर्व आंतरराष्ट्रीय समस्यांवर युद्ध हा एकमेव उपाय आहे. पण असे खरेच आहे का? युद्ध म्हणजे दोन देशांचे रणभूमीवर समोरासमोर भिडणे, हे मी लहानपणापासून ऐकत आलो. युद्धाचा हा अर्थ माझ्या मनात ठसला. युद्धामध्ये जिंकणाऱ्या देशाचे वर्चस्व सिद्ध होते तर हरणारा देश पूर्णतः नामशेष होतो. केवळ हरणे-जिंकणे नव्हे तर लढणाऱ्या देशांची आर्थिक व सामाजिक वाताहत होते. हे मला कळले. खरेच आजच्या युगात युद्ध गरजेचे आहे का?
भारत व पाकिस्तान हे आपल्या शत्रुत्वासाठी प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानकडून सतत होणारे दहशतवादी हल्ले व सीमेवर होणारे सैन्याचे हल्ले हे दोन्ही देशांमधला तणाव वाढवत आहेत. एखाद्या दिवशी ही सहनशक्तीची रेषा जेव्हा एखादा देश ओलांडेल तेव्हा दोन्ही देशांचे युद्ध होणे अटळ आहे. असे म्हणतात की, “प्रेमात व युद्धात सर्व काही क्षम्य असतं”, म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की, पाकिस्तानी फौज भारतीय नागरीकांवर व भारतीय फौज पाकिस्तानी नागरीकांवर हल्ला करेल. आजच्या युगात अणुशास्त्रामध्ये प्रचंड विकास झाला आहे. अशा विकसित जगात जर युद्ध झाले तर एखाद्या देशाचे किती नुकसान होईल याचा प्रत्यय आपल्याला अमेरिकेने द्वितीय विश्वयुद्धाच्या शेवटी दिलाच होता. तर अशा या युद्धात दोन्ही देशांचे अस्तित्व नेस्तनाबूत होईल. भारत – पाकिस्तान युद्ध हे केवळ रणभूमीवरच नव्हे तर खेळाच्या मैदानावरही पाहण्यात येते, मग ते क्रिकेट असो किंवा हॉकी, उत्सुकता तेवढीच असते पण अंतर एवढेच की एखादा संघ हरला तर पुढच्या खेळात त्याचा हिशोब चुकता करता येतो, काही आभाळ कोसळण्याएवढे नुकसान होत नाही परंतु रणभूमीवर दोन्ही देशांचे युद्ध झाले तर भारत व पाकिस्तान प्रगतीच्या मार्गावर मागे पडतील. भारत हा महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे आणि पाकिस्तान हा देश विकसनशील देशांच्या यादीत मोजला जातो. अशावेळी जर अणुशस्त्रांचा वापर जर भारत – पाकिस्तान ह्यांच्या युद्धात झाला तर दोन्ही देश प्रगतीच्या मार्गावर ५६ वर्ष मागे पडतील. दोन्ही देशांचे सैनिकच नव्हे तर सामान्य जनताही बेचिराख होईल. तर असे हे महाभयंकर युद्ध दोन्ही देशांना परवडेल का?
भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश जर लढले तर तिसरे विश्वयुद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. दोन्ही देशांनी हे समजले पाहिजे की ७० वर्षांपूर्वी एकाच देशाचे भाग होते. दोन्ही देशांच्या धरतीवर एकाच प्रकाराची माती आहे आणि ह्या मातीत स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त मिसळलेले आहे. ह्या युद्धामुळे, त्या काळी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाईल. दोन्ही देशांमध्ये जर वाद-विवाद व समस्या असतील तर त्या विवंचना काही वरिष्ठ राजकारण्यांनी समोरासमोर चर्चा करून सोडवावीत व काही उचित मार्ग काढून दोन्ही देशांनी जागतिक विकासाच्या मार्गावर वाटचाल करावी. शेवटी भारतीय काय किंवा पाकिस्तानी काय दोन्ही एकाच मातीचे दोन देश आहेत. अशा ह्या युद्धावेळी गांधीजी व मोहम्मद अलि जिना सुद्धा वरून पाहून म्हणत असतील, “का हे देश विभाजित झाले?”
No comments:
Post a Comment