Wednesday, July 19, 2017

अस्तित्वाचा अर्थ

 

आपण अस्तित्वात असतो म्हणजे काय? हे 'असणे' काय आहे? असा गहन प्रश्न आपल्याला सहसा पडत नसला तरी कधीकधी मात्र तो पडतो. त्या प्रश्नाचे शब्द नेहमी असेच असतात असे नाही पण आशय मात्र असाच असतो.

आपल्या अस्तित्वाच्या ह्या अनुभवाविषयी सतत जागरुक असणे, आपण स्वतःमध्ये 'उपस्थित' असणे ह्याला हल्ली mindful meditation असे म्हणतात आणि तणावमुक्तिसाठी वापरण्याचे एक तंत्र म्हणून ते लोकप्रियही होत आहे. 'टू बी ऑर नॉट टू बी' असा प्रश्न आत्महत्येचे विचार करणार्या हॅम्लेटच्या मनात घोळत होता आणि त्यामागील हेतू 'टू एंड द हार्ट-एक' असा होता. अस्तित्वासह कधीकधी अशा असह्य हृदयवेदना अपरिहार्यपणे येतात.

जे. कृष्णमूर्ती ह्यांनी To be is to be related अशी सुंदर व्याख्या दिलेली आहे. वस्तू, व्यक्ती, वास्तू आणि स्थळकाळाशी असलेले आपले नातेसंबंध, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या स्मृती ह्यांनीच आपलं अस्तित्व सिद्ध होत असतं. एखाद्या वस्तूचा मालक, एखाद्याचा बाप, एखाद्याचा मित्र, एखाद्या गर्दीचा घटक अशी आपली प्रतिक्षणी काहीना काही सापेक्ष ओळख असते. ही नाती जितकी विविध स्वरूपाची असतील तितके आपले अस्तित्व समृद्ध असते असे म्हणता येईल.

मानवी इतिहासातील सर्वाधिक बदल झालेला कालखंड म्हणजे 20 वे शतक असे म्हणता येईल. निसर्ग, सामाजिक व्यवहार, संस्कृती, जीवनशैली ह्या सर्वांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे क्रांतिकारक बदल झाले. सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांतीच्या ह्या पर्वातील त्या बदलांचा वेग अभूतपूर्व होता. कदाचित 21 वे शतक अधिक वेगवान असेल. परंतु अनुभवांच्या जातकुळीमध्ये 20व्या शतकात होती तितकी विविधता असेलच असे नाही. विसाव्या शतकातील पूर्वार्धात जन्मलेल्या आणि अजून हयात असलेल्या व्यक्तीने निसर्ग आणि तंत्रज्ञान ह्यांच्यातील विविधतेचा आणि जीवनशैलीतील बदलांचा जो अनुभव सहजगत्या घेतलेला आहे तसा पुढे क्वचितच घेता येईल.

                  Jagnyatil Kahiवस्तू, व्यक्ती आणि वास्तूंशी असलेल्या भावनिक गुंतवणुकीचे हृद्य चित्रण हा डॉ. अनिल अवचट ह्यांच्या लेखनाचा एक विशेष आहे. त्यांच्या अशा काही लेखांचे संकलन "जगण्यातील काही'' ह्या त्यांच्या पुस्तकात केलेले आहे. 2005 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही ताजे वाटते. आपल्या शाळेच्या ग्रंथालयात हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यातील लेख तर त्यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. विविध स्तरांवर आणि विभिन्न संदर्भांमध्ये 'उपस्थित' राहून जगण्याचा अनुभव घेण्याची कला लेखकाला साधलेली आहे. हे लेखन स्वान्तसुखाय केलेले असो किंवा संपादकांची मागणी पुरविण्यासाठी केलेले असो, वैचारिकतेचा आव न आणणारे आहे. पण तरीही चिंतनाला प्रवृत्त करणारे आहे. मुख्य म्हणजे ह्या सर्वातून 20 व्या शतकातील उत्तरार्धातील मराठी मध्यमवर्गीय जीवनशैलीचा एक दस्तऐवज जाणता- अजाणता तयार झालेला आहे.

व्यवसायाने वैद्यकीय पेशातील डॉक्टर असलेल्या लेखकांचे लेखन बहुधा सरस असते असा माझा अनुभव आहे. त्यांचे लेखन त्यांच्या व्यवसायासंबंधी नसले तरीही सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास करण्याची सवय ह्यामुळे समृद्ध झालेले असते.

No comments: