- निलिमा भातखंडे
आपल्यापेक्षा आपला गुरु वयानं लहान आहे हे लक्षात ठेवून त्याचं शिष्यत्व पत्करायचं ते सुध्दा त्याचा गुरु बनून हे वाचायला काहीसं विचित्र वाटेल पण खरोखरच त्यात तथ्य आहे. ही छोटी मुलं आम्हा शिक्षकांची सतत परीक्षा घेतच असतात. या परीक्षेला अभ्यासक्रम नाही साचेबंद उत्तरं नाहीत आणि तयारी करायला वेळही नाही. सतत तयारीतच रहावं लागतं. वर्गात शिरल्यावर लुकलुकणारे डोळे आपल्याकडे बघतायत या विचाराने क्षणभर मी अस्वस्थ होते. माझ्या दष्टीने मुलांचे चेहरे व डोळे वाचता आले पाहिजेत. या बाबतीतही एक गंमत आहे ती म्हणजे प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. चेह-यावर दिसणा-या भाव-भावनांमागे बरंच काही दडलेलं आहे. कुठे तरी खट्याळपणा कुठे तरी अनेक प्रश्नांचा गोंधळ, बरंच काहीसं. एकदा हे चेहरे वाचायच तंत्र, त्यांचा मूड ओळखायच तंत्र अवगत झालं की या मुलांना शिकवण्यातला, त्यांच्यात मिसळून जाण्याचा आनंद काही औरच आहे.
या छोट्यांच्या अंगात गुण अगदी ठासून भरलेले असतात ते बाहेर येऊ द्यायची संधी मात्र आम्ही शिक्षकांनीच द्यायची, मी तर असे म्हणेन अशी एकही संधी वाया जाऊ द्यायची नाही, असा पक्का निश्चय करूनच अगदी टपून बसायचं या संधीवरूनच एक मजेशीर अनुभव लिहिण्याचा मोह टाळता येत नाही.
वर्गात नेहमीच मुलं सतरंजीवर व शिक्षिका कधी खुर्चीवर बरेचदा वर्गातच कुठेतरी मुलांच्यात बसलेली किंवा उभी असणं हा प्रकार खरं तर मुलांना व मला नेहमीचाच. कधी कधी हजेरी घेण्यासाठी काही लिहिण्यासाठी टेबलाजवळच्या खुर्चीवर बसत असे. काम झाल्यावर परत नेहमीप्रमाणे वर्गात वावरत असे. या मधल्या वेळात वर्गातील काही मुलं मी खुर्चीवर बसल्यापासून मी उठेपर्यंत अगदी बारकाईने माझ्या प्रत्येक हालचालींचं निरीक्षण करताना पाहिली मी खुर्चीवरून उठून वर्गात वावरताना माझी खुर्चीकडे पाठ वळली रे वळली कि निरखून बघणारी मंडळी अगदी पटकन धावत जाऊन त्या खुर्चीवर बसायची एकच चढाओढ लागायची. मग तिथे दुसरा वर्गच भरायचा. हे माझ्या लक्षात आलं, पण माझं लक्ष आहे हे लक्षात आल्यावर काहीश्या नाखुशीनंच तो ग्रुप बाजूला व्हायचा. त्यांच्या चेह-यावरची नाराजी मात्र माझ्या मनात घर करून राहिली. त्याच क्षणी उद्या या ग्रुपला खुर्ची जरा जास्त वेळ रिकामे करून देण्याचा विचार पक्का केला. ठरल्याप्रमाणे दुस-याच दिवशी तशी संधी दिली. त्यांच्याकडे छान दुर्लक्ष करून वर्गाच्या दुस-या टोकाला काहीतरी काम करत असल्याचा बहाणा करून एकंदर चाललेल्या नाट्याचा अनुभव घेतला. खुर्चीवर बसलेल्या छोट्याने चक्क वर्गाचा ताबाच घेतला, तर दुस-याने मी पण बसणारचं असा हट्ट करून त्याला उठवण्याचा असफल प्रयत्न करून शेवटी एका खुर्चीवर दोघांनी बसून पुढची सूत्रं हाती घेतली. एका खुर्चीवर दोघांनी बसून माझी नक्कल अगदी हुबेहुब करून इतरांचं लक्ष वेधून घेतलंच. वर्गातल्या बहुसंख्य मुलांनी त्याना साथ देऊन कितीतरी नकला करून दाखवल्या. याच खेळातून मग आमच्या मदतनीस बाईंची नक्कल करून त्यांची सर्व कामे आपसात वाटून घेऊन चक्क खाऊ खाण्याची जय्यत तयारी करून मला चकित करायचं म्हणून चूपचाप बसली. खुर्चीवरची मंडळी सुध्दा माझीच नक्कल करत रांगेतून फिरत होती. आता मात्र मी व माझ्या मदतनीस बाईं दोघींनीही वर्गात हस्तक्षेप करणं जरूर होतं. सगळी मुलं अगदी आनंदाने एका सुरात म्हणाली जिजी आज तुमचं काम आम्ही केलं, तुमची गंमत केली. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. आम्ही सुध्दा अगदी भारावून गेलो. आमच्या मदतनीस बाईंना आम्ही सर्व व मुलं जिजी म्हणायचो. या प्रसंगी जिजींच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वहात होता. त्यांनाही गहिवरून आले. मुलांच्या चेह-यावरचा आनंद, आत्मविश्वास, सहचर्य, निरीक्षण, शिस्तपालन इ. अनेक चांगल्या गुणांची झलक क्षणात दिसली. बस या एकाच संधीचा फायदा घ्यायचा ठरवला. दुस-या दिवशी या प्रसंगाबद्दल गप्पा गोष्टी करायच्या ठरवलं. त्या प्रमाणे सुरुवातही झाली. मला हव्या त्या ट्रॅकवर गाडी आल्यावर मी प्रश्न विचारला, काल माझ्या खुर्चीवर कोण बसलं होतं? या प्रश्नाला ३/४ मुलांनी मी मी असं उत्तर दिलं आणि ते बरोबरही होतं तुम्ही माझ्या खुर्चीवर का बसलात? या प्रश्नावर मुलांची गाडी जरा अडखळली पण मी रागावणार नाही म्हटल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते विचार करायला लावणार होतं. तुम्ही त्या खुर्चीवर बसता तुमचं आम्ही सगळं ऐकतो जिजिसुद्धा तुमचं ऐकतात. तुम्ही रागावता तरी सुद्धा अम्हाला तुमचं ऐकावच लागतं. तुमच्या खुर्चीत बसल्यावर बाकीची मुलं आमचं ऐकतात. आम्हाला तुम्ही व्हायला आवडतं. गंमत वाटते, म्हणून तुमच्या खुर्चीत बसायला आवडतं.
हा एक प्रसंग मला बरंच काही शिकवून गेला. मनाशी पक्कं ठरवलं त्यांच्यातल्या वळवळण्याच्या स्वभावाला भरपूर हालचाली करू द्यायच्या, जोडीला स्वावलंबन व शिस्त लावायची. पण मी हे करून घेणार आहे हे त्यांना समजू न देता मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवायचा, यातूनच मग रोज वर्गातली जी नित्य बसायची कामं एकट्या मदतनिसावर न सोपवता मुलांना काम करायला प्रोत्साहन देऊन रोजच मुलं अगदी खुशीत सर्व करायला लागली. मस्ती, मारामारी थांबली. पण खुर्चीचं आकर्षण मात्र अजूनही कायम आहे. अजूनही मुलं माझ्या खुर्चीवर बसायला का धडपडतात हे अजूनही मला न उलगडलेलं कोडं आहे. किमान १०० डोळे आपल्याकडे बघतायत; कोणत्या कोप-यातून काय विचारलं जाईल याचा नेम नाही. याची जाणीव सतत होत राहिल्याने म्हणा किंवा गप्पागोष्टीतल्या प्रतिसादाच्या परिणामाचे दश्य स्वरूप असेल वर्गातली पट्टी हद्दपार झाली. अंतर्मुख होऊन स्वत:चंच निरीक्षण करण्याची सवय लागली.
या सगळ्या मागचं कारण एकच आपल्यापेक्षा लहान असलेले हे छोटे गुरु.
No comments:
Post a Comment