Monday, December 29, 2008

यत्न तो देव जाणावा

समर्थांचे विचार -
जीवनात आपल्या वाट्याला जी सुखदु:ख येतात किंवा जे यश-अपयश मिळते. ते प्रारब्धाच्या अधीन असते का प्रयत्नावर निर्भर असते? मानवी मनाला पडलेले हे कोडे खूप जुने आहे. समर्थ रामदासांनी ‘प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध श्रेष्ठ’ या नावाचे एक ओवी शतकच लिहिले आणि त्यामध्ये समारोप करताना प्रयत्नाला श्रेष्ठत्व दिले.

प्रयत्न श्रेष्ठ हे सांगताना समर्थांनी फार चांगला युक्तिवाद केला. ते म्हणाले, की आधी आपण प्रयत्न करतो आणि फळ मिळाले नाही म्हणजे प्रारब्धाला दोष देतो. याचा अर्थ आधी प्रयत्न आहे आणि मग प्रारब्ध आहे. जे आधी येते ते श्रेष्ठ आहे. समर्थ प्रयत्नवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्रयत्न करूनही जर माणूस अपयशी झाला तर ते प्रारब्धावर ढकलत नाहीत ते म्हणत्तात-


अचूक यत्न करवेना । म्हणौनी केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काही केल्या ।।


जर चुकीच्या दिशेने प्रयत्न केल्यामुळे अपयश आले, तर प्रारब्धावरती का ढकलायचे?


प्रारब्ध ही आळशी माणसाने शोधून काढलेली लपायची जागा आहे. एकदा प्रारब्धाच्यामागे लपायचे ठरले के आत्मपरीक्षण थांबून जाते. विज्ञानात ज्याप्रमाणे प्रयोगशील अंत:करण असावे लागते त्याप्रमाणे कर्म करताना चिंतनशीलता हवी. माणसाने जर नीट विचार केला आणि नियोजनपूर्वक कर्म केले, तर ताे कधीही अपयशी होणार नाही. जीवनात यशस्वी झालेल्या सगळ्या महापुरूषांनी विवेकपूर्वक निर्णय घेतले आहेत. त्यांनी अविरत कष्ट केले आहेत.


आधी कष्ट मग फळ । कष्टचि नाही ते निष्फळ ।।
सापेक्षेमुळे केवळ । वृथापुष्ट ।।


असे समर्थ रामदास म्हणतात. कष्टाशिवाय मी द्रव्यार्जन करणार नाही, असा संकल्प जर प्रत्येकाने सोडला तर भ्रष्टाचार विसर्जित होईल. अनेक लोक नियोजन करण्यापेक्षा ज्योतिषाला पत्रिका दाखवून निर्णय घेतात.
याबाबतीत समर्थ पुरूषार्थावादी आहेत, ते म्हणतात-


रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्ययास येते ।
डोळे झाकणी करावी ते । काय निमित्त ।।
घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहूनी जाड ।
तेथे कैचे आणिले द्वाड । करंटपण ।।


जो भविष्य सांगतो त्याच्याकडे जाण्यापेक्षा जो भविष्य घडवितो त्याच्याकडे जावे. समर्थांनी दौर्बल्याची सामर्थांना विलक्षण चीड होती. दुबळा माणूसच लपण्यासाठी जागा शोधून काढतो. कोणत्याही उद्योगपतींचे चरित्र बघा किंवा एखाद्या वैज्ञानिकाचे चरित्र बघा. त्याचा जीवनात प्रयत्नवादाची उपासना पहायला मिळते.


भारतीय शिक्षण परंपरेत विद्यार्थी दहा-बारा वर्षे गुरुकुलात राहत असे. गुरुकुलातले जीवन अत्यंत खडतर असे. तिथे विद्यार्थ्यांना अध्ययनाबरोबरच आश्रमातील कामेदेखील करावी लागत. अलिकडे काही
गरीब विद्यार्थी कमवा आणि शिका - अर्न अँड लर्न - या योजनेनुसार शिकतात. गुरुकुलामध्ये राजपुत्रांनादेखील कष्ट करावे लागत. याचा अर्थ माणसाने सुखात राहूच नये, असे समर्थांचे मत होते, असे मुळीच नाही. त्यांच्या मते, कष्ट हे कारण आहे आणि सुख हे कार्य आहे.


संताना कुणीही शत्रू असत नाही; पण समर्थांना दोन शत्रू होते. एक आळस आणि दुसरा दुश्चितपणा. आळसामुळे मनुष्य प्रयत्न करायचे टाळतो. विनोदाने समर्थ म्हणतात की आळशी माणसाला पडून राहण्याचे काम एवढे मोठे असते की त्यानेच तो थकून जातो. कष्ट टाळण्यासाठी माणूस आळसाच्या मागे लागतो.


दुश्चितपणा हा आळसाचा परिणाम आहे. दुश्चित याचा अर्थ कुठेच लक्ष नसणे. शरीराने एखाद्या ठिकाणी उपस्थित असणे आणि मनाने तेथे नसणे याला समर्थ दुश्चित म्हणतात. विद्यार्थी वर्गाात बसला असेल; पण त्याचे जर तासाकडे लक्ष नसेल तर तो वर्गात असून नसल्यासारख्याच आहे. आळस आणि दुश्चितपणा या दोन दोषांमुळे माणूस एकतर प्रयत्न करायचे टाळतो किंवा प्रयत्न करताना चुकतो आणि अपयश आले म्हणजे नशिबाला दोष देतो. माणसाला अपयशाचे खापर फोडण्यासाठी जागा हवी असते . प्रारब्ध अथवा नशीब ही ती सुरक्षित जागा आहे. एखाद्या व्यक्तिला दोष दिल्यास ती व्यक्ती भांडायला उठेल; पण गुपचूप ऐकून घेणे हेच नशिबाच्या नशिबात लिहिले आहे.

(संकलन - सौ.वनमाळी, सौ जोग.)

No comments: