Wednesday, December 10, 2008

काय आहे हे मनुष्य जीवन - क्षणभंगुर, अशाश्वत !

-  सौ. संध्या समुद्र

आज आहोत उद्या नाही. कधी आतंकवादी हल्ला, कधी निसर्गाचा प्रकोप तर कधी दुर्धर आजारांचा मानवी जीवनावर हल्ला. आणि हा हल्ला इतका जबरदस्त असतो की सगळ होत्याच नव्हत होऊन जात आणि आपण बघण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. ज्यांना हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागले त्यांच्या नातेवाईकांकडे आपण फक्त सहानुभूतीपूर्वक बघू शकतो.

असं सर्व काही घडत असताना एकच विचार मनात डोकावतो हे सर्व अस का घडत? आपण नक्की कोठे कमी पडतो? करतो का आपण सुख शांतीने, एकमेकांना सहकार्य करत जगण्याचा प्रयत्न ? असतो का आपल्या हृदयात एकमेकांबद्दल ओलावा ? नाही ! आजही आपल्याला काय अनुभवण्यास मिळते तर अहंकार, द्वेषभावना, स्वार्थी वृत्ती, अप्पलपोटीपणा आणि ह्यासगळ्यांतूनच काय जन्माला येते तर हिंसक भावना जी देते खतपाणी आतंकवादाला. एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांविरुद्ध कट रचणे, आपले म्हणणेच खरे करणे, एखाद्याला नाहक बदनाम करणे, हे सर्व आजही चालूच आहे. हे करून करण्याला मिळत काय तर एक आसुरी आनंद, राक्षसी विजय ! ह्या आसुरी आनंदाचा, राक्षसी विजयाचा खरोखरच प्रामाणिक आस्वाद घेता येतो का? नाही तर अंत:करणात कुठेतरी शल्य हे असतेच की आपण अस करायला नको होत, पण हे कळत कोणाला ? जो तो आपलाच विचार करण्यात दंग असतो.

अगदी सर्वच मनुष्य प्राणी ह्या आसुरी आनंदामागे किंवा राक्षसी विजयाकडे जात नाही.

काहीजण अजूनही नि:स्वार्थी पणे सगळ्यांवर प्रेम करताना, मदत करताना, एकमेकांसाठी धडपडताना दिसतात. दुसऱ्याच्या आनंदात स्वत:चा आनंद व दुसऱ्यंाच्या दु:खात त्यांच्या जखमी अंत:करणावर प्रेमाची फुंकर घालताना दिसतात त्यांना त्यावेळी मिळणारा आनंद असतो निर्भेळ आनंद . अंत:करण्यात कोणतेही शल्य नसलेला आनंद. दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला मिळाल्याच समाधान.

पण ही लोक असतात जगाच्या दृष्टीने वेडे!. जगण्याचा गमक न कळलेले ! पण खरे वेडे कोण ? आसुरी आनंद उपभोगणारे की निर्भेळ आनंद उपभोगणारे ? शेवटी हा विचार ज्याच्या त्यानी करायचा आहे.

जर ह्या भूतलावरील सर्वच मनुष्यप्राण्यांनी नि:स्वार्थी जीवन जगण्याचा निर्धार केला, सर्वांना अंत़़:करणपूर्वक मदत केली, सर्वांवर प्रेम केले तर निदान मनुष्यप्राण्यांच्या दहशतवादी कारवाया तरी कमी होतील.

निसर्ग प्रकोप, दुर्धर आजार हे रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करता येईल.

आपल्यावाट्याला आलेल्या ह्या जीवनाचा सर्वतोपरीने उत्तमरितीने जीवन जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा निदान त्यादृष्टीने विचार तरी करायला काय हरकत आहे? आपण जाताना आपल्याबरोबर काय घेऊन जातो? नाही पैसा , नाही संपत्ती, नाही सत्ता. पण आपण केलेल्या कामाची दखल तर निदान पुढील पिढी घेऊ शकते. पुढच्या पिढीला तरी आपण चांगले संस्कार, आचरण देऊन त्यांचे जीवन तरी समृद्ध करूया ज्यायोगे त्यांना सगळ्या आतंकवादी कारवायांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही !

तरी सर्वांनी आपल्या अंत:करणात आपल्या नि:स्वार्थी प्रेमाचा झरा पाझरायला सुरुवात करूया.

जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो

भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे

दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वर्धर्मे सूर्ये पाहो

जो जे वांच्छिल तो ते लाभो प्राणीजात

No comments: