Thursday, July 30, 2009

शिक्षक , विद्यार्थी व शिक्षण


माध्यमिक विभागाच्या तुकड्यांची संख्या 29 असून प्रत्येक तुकडीत सरासरी 75 ते 75 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे.

नव्या आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ‘शिकणे व शिकायचे कसे हे शिकणे’ हे आवश्यक आहे. यातूनच लवचिक आणि सर्जनशील शिक्षण घेणे ही उद्दिष्टे लक्षात घेऊनच शिक्षकांना पदवीच्यावेळी त्यांच्या असलेल्या विषयाप्रमाणे आणि प्रशिक्षणाच्या वेळी असलेल्या पद्‌धतीप्रमाणे मराठी माध्यमिक विभागाच्या शिक्षकांना वर्ग-विषय तासिका यांचे नियोजन केले.

शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. इ. 5वी ते 8वी ला महाराष्ट्र शासनाकडून सर्व शिक्षा अभियाना मार्फत मे अखेर ते जून पूर्वार्धात सर्व पुस्तके मोफत देण्यात आली आहेत.

आतापर्यंत बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सर्वच शिक्षकांचे झाले आहे. अनेक शिक्षकांनी प्रशिक्षण तज्ञ म्हणून काम केले आहे.
परीक्षा पद्‌धती, गुणांकन यांचे मार्गदर्शन वेळोवेळी आमचा शिक्षक-पालक सभेत देत असतो. मराठी माध्यमिक विभागातील शिक्षक निश्चितच जागृत आहे.

वर्गाध्यापन ज्ञानरचनावादी कसे करावे हे विद्यार्थ्यांना पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ यांच्यावरील आकर्षक चित्रकल्पनेतून दिग्दर्शित करत असतात. शैक्षणिक अनुभव व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आमच्या ज्येष्ठ शिक्षकांकडून घेत असतात.

मराठी माध्यमातील प्रशिक्षित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषयांची गोडी वाटावी यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध विषय - कोपरे तयार करून घेतले आहेत. व आमचे वरिष्ठ त्या विषयकोपऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे ज्ञान अजमावून पाहतात.

गतिमान भौतिक प्रगतीवर विधायक नियंत्रण ही काळाची गरज आहे. फक्त विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक शिकविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. ओझ्याविना अध्यापन हे तत्त्व लक्षात ठेवावे. दप्तराचे ओझे नसून न समजता केलेल्या अध्ययनाचे ओझे अतिशय चिंताजनक आहे, हे होऊ नये असा प्रयत्न आमचे शिक्षक करीत असतात.

आमचे शिक्षक पाठ्यपुस्तक पूर्ण करणे हे उद्दिष्ट मानत नाहीत तर -

Seal of Maharashtra



1) ज्ञानाचे नाते शाळेच्या बाहेरील जीवनाशी जोडणे

2) घो़क़ंपट्‌टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे.

3) शिक्षण हे पाठ्यपुस्तककेंद्रित न राहता मुलांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग करणे.

‘जे शिक्षण सन्मानाने जगायला शिकवते ते खरे शिक्षण होय’. स्वामी विवेकानंदांच्या उक्तीनुसार ‘आपले विचार हीच आपली ओळख असते. विचार उच्च असावेत, शब्द दुय्यम.’ विचार चिरायु व अनंतकालीन असता.

भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांची भूमिका समाजाच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची व मोलाची मानली जाते. शिक्षक हा मूल्यक्रांतीचा अग्रदूत आहे.

शिक्षक म्हणजे ‘शाळेत शिकविणारी व्यक्ती’ आणि शिक्षण म्हणजे ‘शिक्षकांमार्फत वितरित करण्याची गोष्ट ’ एवढाच मर्यादित अर्थ लावणे ही शिक्षकांची भूमिका नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक शिकवितो हे खरे असले तरी तो (खरा शिक्षक ) विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या अनुभूतीतून मूल्यांचे संस्कार करतो.

मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो. तो सतत नवीन शिकत असतो. शिक्षक सुद्‌धा याला अपवाद नाही. तो आपल्या विषयाचे मनापासून अध्ययन करूनच अध्यापन करतो. त्यासाठी सतत आपल्या ज्येष्ठ शिक्षकांबरोबर, पालकांबरोबर इतकेच नाही तर काही वेळा विद्यार्थ्यांबरोबरही चर्चा करतो. सध्याचा विद्यार्थी खूप हुशार आहे.

शिक्षण देण्यासाठी विविध अभ्यासक्रमांचा साधन म्हणून उपयोग केला जातो. हे अभ्यासक्रम पुस्तकरुपाने मांडले जातात. परंतु केवळ पुस्तकी अभ्यासक्रम जीवनात यशस्वी व्हायला पुरेसे पडत नाहीत. केवळ पुस्तकी अभ्यासक्रमाचा जीवनात उपयोग होईल असे समजणे म्हणजेच बिनशिडाच्या जहाजातून जीवनाचा महासागर पार करण्याचे स्वप्न होय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

क़ोणतेही पाठ्यपुस्तक हे आशयनिश्चितीचे साधन असते म्हणूनच शिक्षक पाठनियोजन करताना पाठ्यपुस्तकाबाहेरील उदाहरणे देण्याचा प्रयत्न करतो.

आमचे शिक्षक प्रशिक्षित असून स्वत: शिक्षणातून आनंद मिळवतो. माझ्या मते तरी, सर्वच शिक्षक बंधू - भगिनी त्यांच्या विषयात सक्षम आहेत, अशी माझी तरी खात्री आहे.

कवी अनिलांच्या भाषेत शेवटी एवढेच म्हणता येईल

“उठा रे ! उठा रे ! सत्वर सत्वर ! तत्पर तत्पर !

पेरा पेरा पेरा ! नवे बीज पेरा ! नव्या आशा धरा !

पेर्ते व्हा ! पेर्ते व्हा ! पेर्ते व्हा ! “

प्रेषिका - श्रीमती पल्लवी राजाध्यक्ष -
मराठी माध्यमिक विभाग

No comments: