Sunday, March 4, 2018

जीवाश्मांच्या दुनियेतील फेरफटका


Intro - मुंबई विद्यापीठाच्या एक्स्ट्रा म्युरल स्टडीज या विभागाने गेल्या महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात आयोजित केलेलं भूशास्त्रविषयक प्रदर्शन देखणं होतं. दगडांच्या अंतरंगात दडलेलं स्फटिकं, जिओड्स, मौल्यवान रत्नं, जीवाश्म यांचं अद्भुत जग भान हरपून टाकणारं होतं. यंदा या प्रदर्शनात आपल्या शाळेत आठवीत शिकणाऱ्या अगस्ती देशपांडे या विद्यार्थ्याने आपलं जीवाश्माचं कलेक्शन मांडलं होतं. या प्रदर्शनात सहभागी झालेला अगस्ती सर्वात लहान प्रदर्शक होता. मुख्य म्हणजे त्याने जीवाश्मांचे जे कलेक्शन मांडलं होतं, त्यात प्रामुख्याने त्याने स्वत: गोळा केलेल्या जीवाश्मांचा समावेश होता. अगस्तीशी बोलून जीवाश्मांच्या त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अगस्तीच्या या अनोख्या छंदाविषयी, त्याच्याच शब्दांत...
***
अगस्ती देशपांडे - VIII
जीवाश्मांच्या जगाविषयी मला नेहमीच कुतुहल वाटत आलंय. पुस्तकांतून, इंटरनेटवरून मला या संबंधी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी नेहमीच करतो. २०१४ मध्ये आई-बाबांसोबत मेघालयात फिरायला गेलो तेव्हा तेथील काही खाणींमध्ये पूर्ण छताच्या आकारातील शार्क माशाचं फॉसिल्स पाहिलं तेव्हा मी हरखून गेलो होतो. २०१५ मध्ये मी आम्ही स्पितीला गेलो होतो. तेथील काही विशिष्ट प्रदेशात फॉसिल्स मिळत असल्याचे माहीत होते. तिथेही आम्ही आवर्जून फिरायला गेलो. समुद्रसपाटीपासून साधारण १२ हजार ते १४ हजार फूटांवर असणाऱ्या स्पिती प्रदेशात फिरताना खूपच अडचणी येत होत्या. ऑक्सिजनचा अभाव, गार वाऱ्यांचा मारा आणि गारवा असूनही समुद्रसपाटीपासून खूपच उंच ठिकाणी असल्याने प्रखर सूर्यकिरणं असं विचित्र हवामान तिथे होतं. तिथे शोधल्यानंतर मला काही फॉसिल्स हाती लागले आणि एक मोठा खजिना हाती आल्याचा आनंद मला झाला.
त्यानंतर काही महिन्यांतच येऊ घातलेल्या मुंबई विद्यापीठाच्या भूशास्त्र विषयीच्या माझ्या आवडत्या प्रदर्शनाची मी वाट पाहात होतो. त्याआधीही मी तिथे अनेकदा गेलो आहे... तिथे मांडलेले निरनिराळे तेजस्वी, रंगीबेरंगी खडक बघायला मला आवडतं. तिथले स्वयंसेवकाच्या भूमिकेतील दादा-ताई, सर-मॅडम प्रत्येक दगडाची कितीतरी माहिती द्यायचे आणि ते ऐकताना माझा आ वासला जायचा.
पण फॉसिल्स हाती लागल्यापासून मला हे प्रदर्शन कधी भरतंय असं झालं होतं. याचं कारण मला त्या प्रदर्शनातील जीवाश्मांच्या विभागातील तज्ज्ञांना भेटून त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं. मला वरचेवर पडणाऱ्या काही प्रश्नांची तर मी लिस्टही केली होती. आणि मग २०१६ च्या डिसेंबरमध्ये भरलेल्या या भूशास्त्र प्रदर्शनात एकदा नव्हे तर दोनदा गेलो. पहिल्यांदा प्रदर्शन पाहिले, जीवाश्मांबद्दल काही प्रश्न होते, ते तिथल्या सरांना विचारले. त्यावर सरांनी तुझं कलेक्शन घेऊन ये दाखवायला, असं सांगितलं आणि मी पुन्हा तिथे गेलो- फॉसिल्स घेऊन. जेव्हा त्या सरांनी सांगितलं की, हे फॉसिल्स १५० दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत, तेव्हा तर मला आनंदाने नाचावंसं वाटलं. आमच्या घरातील सर्वात यूनिक वस्तू ही आहे, याचा जणू साक्षात्कार आम्हा सर्वांना झाला. अशी आहे माझ्या पहिल्यावहिल्या फॉसिल्स कलेक्शनची गोष्ट. मी जेव्हा सरांकडून माझ्यापाशी असलेल्या फॉसिल्सविषयी अधिक जाणून घेत होतो, तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या एक्स्ट्रा म्युरल विभागाच्या संचालक मुग्धा कर्णिक मॅडम यांची भेट झाली. त्यावेळेस पुढच्या वर्षी तुझं कलेक्शनही मांड या प्रदर्शनात, या त्यांच्या बोलण्याने मला जणू शाबासकी मिळाल्यासारखी वाटली.
गेल्या उन्हाळी सुट्टीत मी माझ्या मनिषा मावशीकडे राहायला इंग्लंडला गेलो होतो. लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये फिरताना तिथल्या जिओलॉजी सेक्शनमध्ये मला वेगवेगळे खडक, जीवाश्मं बघायला मिळाली. काही छोटे दगड तिथून मी खरेदीही केले. शीतल मावशीने आम्हाला वेल्स परिसर फिरवला. तिथल्या ग्रेट आर्मे हिल या आधी खाण परिसर असलेल्या भागात फिरणं हा माझ्यासाठी ग्रेट अनुभव होता... टिपिकल हेल्मेट घालून त्या खाण परिसरात पर्यटक म्हणून फिरता येण्याकरता आवश्यक ती सर्व सुविधा तिथल्या प्रशासनाने तिथे केल्या होत्या. खाणीत प्रकाशाची सोय, जिथे काही वेगळ्या प्रकारचे दगड आहेत, त्यावर प्रकाशझोत पडलेला असणे हे सारं कमालीचं प्रेक्षणीय होतं. तेथील सोव्हेनियर शॉपमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड तिथे मांडून ठेवण्यात आले होते, त्यात काही फॉसिल्सही होते आणि मी जाम खूश झालो... काही खूपच वजनदार, काही प्रचंड महाग... काही अत्यंत दुर्मीळ, वेगळ्या प्रकारचे फॉसिल्स खरेदी करायची मुभा मला आईने दिली आणि या ट्रिपमध्ये मला आणखी काहीही खरेदी करायचे नाही, असे वारंवार सांगत मी तिथे काही दगड आणि फॉसिल्स खरेदी करण्यात यशस्वी झालो. त्यामुळे माझ्या फॉसिल्स कलेक्शनमध्ये भर पडली.
मुग्धा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्यांच्याशी महिनाभर आधी संपर्क केला. त्यांनी माझं कलेक्शन पुन्हा एकदा पाहिलं. मी ते कसं जमवलं हे त्यांनी जाणून घेतलं आणि त्यातील मी जमवलेली फॉसिल्स प्रदर्शनात मांडायला त्यांनी परवानगी दिली. खरं सांगू, या प्रदर्शनात सहभागी होईपर्यंत केवळ छंद म्हणून मी फॉसिल्स कलेक्शन करत होतो. पण चार पूर्ण दिवस भूशास्त्राच्या वेगवेगळ्या विषयांबाबत जाणून घेतल्यानंतर त्यातील विविध शाखांविषयी कळले. भूशास्त्राच्या दादा-ताईंनी कितीतरी माहिती दिली. विविध अमूल्य खडक, फॉसिल्स यांचे कलेक्शन करणारे ज्येष्ठ तज्ज्ञ श्री. मक्की सरांशी संवाद साधता आला. त्यांनी प्रोत्साहनपर मला जेव्हा काही फॉसिल्स दिले, तेव्हा मला किती आनंद झाला, मी सांगू शकत नाही.
इतकंच काय, प्रदर्शन बघायला आलेल्यांमध्येही कितीतरी तज्ज्ञ, भूशास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक होते. माझं वय आणि कलेक्शन पाहून ते सगळे माझ्याशी आपुलकीने बोलले, कितीतरी नवी माहिती दिली. या सगळ्यांचाच मी ऋणी आहे. छंदाच्या पलीकडे पोहोचत त्यातील अधिकाधिक गोष्टी जाणून घ्याव्यात, असं मला वाटू लागलंय.


1 comment:

P A Ramchandra said...

फारच छान अगस्ती. भविष्यकाळासाठी शुभेच्छा.