78 वर्षांचे भागवत सर शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या वयाचा अंदाज त्यांनी सांगितल्याशिवाय कोणालाही आला नसता. 500 मुलांचा समुदाय आपल्या ओघवत्या शैलीने आणि आत्मविश्वासाने त्यांनी जागच्या जागी खिळवून ठेवला. विद्यार्थ्यांना अभ्यास दिला आणि त्यांना नोट्स काढायला लावल्या. आताचे विद्यार्थी माझ्या नातवंडांच्या वयाचे असून मी त्यांचा आजोबा आणि मित्र आहे असे त्यांनी सांगताच सर्वांनाच ते मनोमन पटले. भागवत सरांचा ज्ञानयज्ञ गेली 62 वर्षे अव्याहतपणे सुरू असून शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ते मराठी आणि हिंदी ह्या विषयांसाठी मार्गदर्शन करतात.
परंतु भागवत सरांची ही ओळख अगदीच त्रोटक ठरेल. आपल्या कारकिर्दीचा बहुतेक भाग डोंबिवलीकरांच्या सेवेत व्यतीत केल्यानंतर भागवत सर आता वास्तव्यासाठी बोरिवलीला आले आहेत हे समजल्यावर मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर ह्यांनी त्यांना आवर्जून शाळेतील शिक्षकांच्या आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आणले.
सरांनी अनेक सेवाभावी संस्थांसाठी लाखो रुपयांच्या देणग्या मिळवून दिलेल्या आहेत. आपण नोकरीतून निवृत्त झालेलो आहोत पण ‘सेवा'निवृत्त नाही हे त्यांनी आपल्या समर्पित जीवनातून दाखवून दिलेले आहे.
उत्कृष्ट आणि सव्यसाची वक्ता म्हणून सरांची ख्याती आहे. मकर संक्रमण, कालीदास दर्शन, आम्ही धर्मनिष्ठ की विज्ञाननिष्ठ, गीता सुभाषिते आणि त्यांचे सार, इथपासून ते विविध संतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या जीवनगाथा, अंदमानची तीर्थयात्रा ह्यासारख्या अनोख्या 30-35 विषयांवर सर ठिकठिकाणी व्याख्याने देतात. इतकेच नाही तर हजारो पृष्ठांच्या अनुवादाचे कार्यही सरांनी केलेले आहे.
'वंचित विकास' ह्या पुणे येथील सेवाभावी संस्थेचे विश्वस्त असलेले भागवत सर सध्या दधीचि देहदान मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. अधिक माहितीसाठी 022-28609683 ह्या क्रमांकावर आपण ह्या व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वाशी संपर्क साधू शकता.
No comments:
Post a Comment