Thursday, July 21, 2011

शाळेचा 50वा वर्धापन दिन

 

आईप्रमाणे आपल्यावर चांगले संस्कार करुन, जी आपल्याला आयुष्यात एक चांगली व्यक्ती म्हणून घडविते ती म्हणजे आपली शाळा.

ज्या मंदिरात आपण विद्या मिळवतो त्या मंदिराचा म्हणजे आपल्या दहिसर विद्यामंदिर शाळेचा 50वा वर्धापन दिन.

शाळेची स्थापना 18 जून 1962 रोजी झाली. त्यावेळी दहिसर गावात एकही मराठी शाळा नव्हती. या गावातील सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी रेल्वे ने दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असे.

एकदा रेल्वे अपघातात देसाई नावाच्या विद्यार्थ्याला आपला प्राण गमवावा लागला. तेव्हा येथील सर्व सामान्य लोकांनी एकत्र येऊन या दहिसर विद्या मंदिर शाळेची स्थापना केली आणि आज या वास्तूने 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

या 50 वर्षात शाळेची खूपच प्रगती झाली आहे. आज मोठ्या दिमाखाने ही शाळेची वास्तू 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे आणि त्यांना घडविण्याचे कार्य करत आहे.

शाळेची इमारत भव्य असून शाळेत इंग्रजी व मराठी माध्यमाचे वर्ग भरतात. प्रत्येक तुकडीसाठी स्वतंत्र वर्ग असून तो सर्व सोईंनी सुसज्ज असा आहे.

कु. प्रिअल पाटील शाळेत वाचनालय, संगणक वर्ग तसेच प्रयोग शाळेची अत्यंत चांगल्या तऱ्हेने स्वतंत्र सोय केलेली आहे. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग सतत शाळेच्या प्रगतीसाठी झटताना दिसतात. शाळेचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध आहे.

अशा या माझ्या शाळेचा आम्हां सर्वांना अभिमान असून तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी हीच सदिच्छा!

“ धन्य धन्य ती शाळा!
जी देशासाठी तयार करिते बाळा।। ”

कु. प्रिअल पाटील
9 अ.
मराठी माध्यमिक विभाग.

No comments: