Tuesday, February 9, 2010

अफगाण मुक्तीचा आक्रोश

हिरॉइन ऑफ अफगाणिस्तान

मीना :- अफगाण मुक्तीचा आक्रोश

लेखिका : मेलडी अर्माचाईल्ड चेव्हिस

अनुवाद : शोभा चित्रे/दिलीप चित्रे राजहंस प्रकाशन

मूल्य - 150 रुपये, एकूण पृष्ठे 177


गेल्या तीन वर्षापासून सर्व पुस्तकप्रेमींसाठी वाचनीय पुस्तकाचे निवडक अभिप्राय याचे टिपण संग्रहित करण्याचे कार्य ग्रंथालयात चालू आहे. हे निवडक अभिप्राय ग्रंथालयातील फलकावर सादर केले जातात. आता हे सदर शाळेच्या ब्लॉगवर सुरू करण्याचे ठरले आहे
हे एक आत्मचरित्र आहे, पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रावरूनच स्त्रियांच्या गळचेपीची कल्पना येते. अफगाण कायम अशांत देश. 1955 पासून स्वार्थी अफगाण राजकारण्यांनी रशियाशी संधान साधून रशियन सैन्य अफगाणात घुसविले, त्याला प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेने आपले सैन्य पाठविले. या दोन महासत्तांच्या लढ्यात अफगाण जनता भरडली जात असताना तालिबानने दहशतवादी पाय पसरायला सुरुवात केली. हिंस्त्र तालिबानीच्या कृत्याने जनता होरपळून गेली. स्त्रियांच्या मुलभूत अधिकारावर, स्वातंत्र्यावर गदा आली. स्त्रियांच्या या दारुण परिस्थिती विरुद्‌ध लढा देण्यास उभी राहिली विशीतली एक तरुणी - मीना. तिने अफगाणमधील सुशिक्षित स्त्रियांना एकत्रित करुन रावा नावाची सामाजिक प्रबोधन करणारी संघटना स्थापन केली. या संघटनेचे भूमिगत कार्य सुरू केले. याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याविषयी झेन संघटना निर्माण केली. बुध्दिजीवी पुरुषांनी भूमिगत कार्य सुरू केले. त्यात अनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागे. जीवावर उदार होऊन कार्य चालू होते. यांतच मीनाचा विवाह डॉ. फैस बरोबर झाला तो ही माओवादी असून भूमिगत कार्य करणारा होता. त्यामुळे सतत दोघेही एकमेकांपासून दूरच असत. हे कार्य चालू असताना ओसामा - बिन - लादेनचा अफगाणमध्ये हस्तक्षेप झाला. त्यामुळे तेथील जनतेची न भूतो न भविष्यति अशी दुरवस्था दहशतवादी कारवायांमुळे झाली. या दहशतवादी हल्ल्यात वयाच्या 30 व्या वर्षी मीना मारली गेली.
मुक्तीची किंमत कशी चुकवावी लागते हे प्रभावीपणे जाणवून देणारे आणि प्रत्येकानेच वाचावे असे हे पुस्तक आहे.

- पल्लवी चं राजाध्यक्ष

No comments: