Thursday, August 6, 2009

पाठीचा कणा ताठ कसा ठेवावा?

           व्यक्तीची उचित घडण व्हावी, ज्ञानवृद्‌धी बरोबरच त्यांच्यात तेजस्विता, धाडसीवृत्ती वाढावी, तसेच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय जडावी, नवकल्पना नवे विचार व्यक्त करता याव्यात, निकोप स्पर्धांना सामोरे जाण्याची ईर्ष्या अंगी बाणावी यासाठी कणा ताठ ठेवण्याचे दहा मार्ग अत्यंत मार्गदर्शक आहेत. सक्षम, सदृढ, संपन्न व प्रसन्न जडण -घडणीसाठी सदर अभ्यास मोलाचा आहे.
           जीवनात निश्चित ध्येय वास्तवात आणण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती व स्वत:वरचा ठाम विश्वास, करारीपणा, निर्भिडपणा, स्पष्टवक्तेपणा, आवश्यक तेथे लवचिकता इत्यादी गुणांवर प्रकाशझोत टाकणारे मार्गदर्शन मोलाचे वाटले. सदर पुस्तकाचा आशय लक्षात घेतल्यानंतर ‘ कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.
आपले उद्दिष्ट स्पष्ट नसले की, विचारांचा आश्रय घेतला जातो. निराधार विचार थैमान घालू लागतात आणि म्हणूनच जी कृती करायची आहे. त्याबाबतीत योग्य दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगात असताना त्यांना शारीरिक, मानसिक क्लेश भोगावे लागले. इंग्रज सरकारच्या दमन - चक्रापुढे ते थकले नाहीत. ते परिश्रमपूर्वक पाली, हिब्रू , फ्रेंच, जर्मन भाषा शिकले. जर्मन भाषेतील बेबरचा ग्रंथ त्यांनी वाचला. दर तासाला 5 पाने याप्रमाणे त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला. बंदिवासात असताना स्वत:च्या स्वाभिमानी वृत्तीमुळे ते आपला वेळ सत्कर्मात घालवू शकले.
           आपल्याबद्दल लोक काय विचार करतात, याचा विचार करायचा नाही. अहंकाराच्या अंबारीत बसलेल्या विद्वान सम्राटाला आकर्षित करण्याचे व अंबारीतून उतरवण्याचे सामर्थ्य आपल्या सखोल विचारपूर्वक कामात असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वत:चा आत्मसन्मान वाढतो.
           हे  स्पर्धेचे युग आहे . ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. आणि त्यामुळे स्वत:च्या प्रगतीसाठी करारी व सखोल विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. एकंदरीत ताठ कण्यामुळे स्वत:च्या प्रगतीची दिशा ठरविता येते. कर्तव्यपूर्ती करता येते, आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक भूमिका निर्माण होते. आपण निर्भयपणे जगू शकतो.
“Get Better or get Battered”
      “पाठीचा कणा ताठ कसा ठेवावा?” ङीम. सुझान मार्शक यांच्या पुस्तकावर आधारित आपला लेख वाचून मनाला आनंद झाला. व त्याविषयी श्रीम. म्हात्रे बाई आपली मते नोंदवू इच्छितात.
1. येणा-या आव्हानावर आरुढ व्हावे लागते, पळवाटा काढून चालणार नाही.
2. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे विचार करण्याची क्षमता नक्कीच प्रत्येकाची वेगळी. त्या ब-या - वाईट विचारसरणीला सामोरे जावे लागते. खचून चालत नाही. तरीही मनाला थोडेफार दु:ख होते, हा परिणाम होतोच, हा माझा नकारात्मक दृष्टिकोन नाही. मानवी मन म्हणजे दगड नाही तर ते संवदेनशील असते.
3. सखोल विचारपूर्वक काम मनाला उभारी देते हे काम करत असताना टीका, निराशा, द्वेष याचा काहीही परिणाम होत नाही.
4. माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच जीवनाला सामोरे जावे लागते.
5. कवी कुसुमाग्रजांच्या कवित्तेतला तरुण नायक म्हणतो.
मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.

मराठी माध्यमिक विभाग.
प्रकल्प प्रमुख
राजाध्यक्ष मॅडम


No comments: