Sunday, September 28, 2008

एक सेवाव्रती वाटचाल

माणूस म्हणून जगण्यातील तत्त्व, स्वत्व आणि सत्त्व जागे करते ते शिक्षण. ही प्रक्रिया सतत चालू असते. शिक्षणाने समाजाचाही उद्धार होतो पण आत्मोद्धार साध्य करण्याचे ते एक साधन आहे. शिक्षण क्षेत्रात असे साधक असतात. अशाच एका सेवाव्रती साधिकेची ही वाटचाल.

सौ. आसावरी अशोक सुर्वे हया दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून पदार्पण केले ते 13 जून 1969 रोजी. नेरळ विद्या मंदिर ही त्यांची ज्ञानभूमी. याच शाळेत त्यांनी साकाराकडून सदाकाराकडे नेणारी वाटचाल सुरू केली. नेरळ विद्या मंदिर या शाळेला "आदर्शशाळा' म्हणून जिल्हयाचे पारितोषिक मिळाले त्या आनंदक्षणाच्या ह्या साक्षीदार.

पुढे विवाहानंतर 1974 पासून विद्या मंदिरात शिक्षकी साधना सुरू झाली. संगीत आणि भाषा विषयांचे अध्यापन करून विद्यार्थी जगतात एक आदर्श घटक म्हणून स्थित झाल्या, 2004 पासून मुख्याध्यापिकेच्या चैतन्यदायी वळणावर वाटचाल करताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

1) भारतीय समाज विकास अकादमीचा राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार 2007 नवी दिल्ली येथे प्राप्त झाला. तेथील गुणीजन परिषदेत त्यांनी "2020 सालची महासत्त्ता म्हणजे भारत' या विषयावर भाषण केले.

2) अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ व पत्रकार लेखक मुंबई येथे डॉ. विजया वाड यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप ग्रहण केली.

3) वीर जीजामाता विश्वस्त संस्था मुंबई यांच्यावतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. या संस्थेच्या विद्‌यार्थ्यांना गेली पाच वर्षे त्या मराठी प्रथम भाषेचे मार्गदर्शन करतात.

4) अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ व अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या कडून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुरस्कार 2008 साली प्राप्त झाला.

5) अभ्यास मालिका दहावी यशस्वी भव साठी त्या विद्‌यार्थ्यांसाठी सतत 4 वर्ष प्रथम भाषा मराठीचे लेखन करीत आहेत.

6) शिक्षकांपाशी अद्ययावत ज्ञान हवं म्हणून त्यांनी 2007 मध्ये शिक्षण व्यवस्थापन पदविका घेतली. यात त्यांना 75% टक्के गुण प्राप्त झाले. या अभ्यासाक्रमांत त्यांनी लिहिलेल्या शोध निबंधांची शीर्षके आहेत -

1) विदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापन

2) शालेय प्रार्थना एक अभ्यास

प्रकल्प - पूर्वसूचनेविना केलेले पाठ परिसण एक अभ्यास.

7) या साऱ्या वाटचालीवरील प्रसन्न टप्पा म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिलेला 2007-2008 चा आदर्श शिक्षक पुरस्कार होय.

clip_image002

संस्थेच्या कारकीर्दीतील हा मंगलमय स्वानंद ! विद्‌यार्थ्यांच्या समस्या लीलया दूर करणाऱ्या या मुख्याध्यापिका आहेत. उदाहरणार्थ, गेली अनेक वर्षे मीरा-भाईंदरकडून येणाऱ्या मुलांना अडीअडचणीला सामोरे जाऊन शाळेत यावे लागते. त्यांची दयनीय अवस्था बाईंच्या डोळयात पाणी आणते. त्या मुलांसाठी मागाठाणे आगाराकडे धाव घेऊन त्यांनी खास बससेवा सुरू केली. खरोखरच संवेदनांना साद घालणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. सौ. सुर्वेबाईंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!