Sunday, February 17, 2008

"ज्ञ' चे संपादकीय

छात्र: परं दैवतम | हा विचार मनात रुजतो आणि शिक्षकाच्या धडपडीला प्रारंभ होतो. शिक्षकी व्यवसायाचे सार्थक तेव्हाच होते जेव्हा त्याच्या धडपडीतून काही विद्यार्थी घडतात. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांकडून त्यांना प्रेम मिळते.

‘हृदया हृदय मिळाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले... ’ ह्या वचनाचा अनुभव प्रत्येक शिक्षक घेत असतो. विद्यार्थ्यावर निष्ठा ठेवून अनेक चांगली कामे घडत असतात. काम करता करता काही आनंदाचे क्षण प्रेरणा देतात. त्या प्रेरणेतूनच शिक्षकाची क्षमताही वाढत जाते. अध्यापन करता करता तो ही अध्ययन करु लागतो.

वास्तवाच्या वाटेवर तो सक्षमतेने उभा राहतो. कधीतरी तो आपले अनुभव शब्दबद्ध करतो. वेचून आणलेले ज्ञानकण कृतार्थाने पाहतो आणि व्यवसायाला धन्य मानून शिक्षणाचा ध्यास घेतो. विद्यार्थ्यांची चैतन्यमूर्ती त्याला कार्य प्रवृत्त करते.

आजच्या शिक्षकाची ही स्पंदनं ‘ज्ञ’ ने ऐकली आणि ग्रथित झाली काही शिक्षकांनी आपल्या विरंगुळ्याचे क्षण गुंफले, काही शिक्षकांनी अनेक पुस्तके चाळली, अनेक चांगले विचार संग्रहित केले ‘अंतरीचे धावे, सहज स्वभावे’ प्रकट झाले आणि हा लेखसंग्रह तयार झाला.

ह्या लेखसंग्रहातील लेख क्रमशः ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करीत आहोत. बदललेला अभ्यासक्रम, नवीन परीक्षापध्दती, मूल्यमापनाचे नवीन निकष, ‘सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गत होत असलेली शिक्षकांची प्रशिक्षणे, वाढती विद्यार्थीसंख्या पालकांची मानसिकता, स्पर्धांचे ताणतणाव या सा-या गोष्टींना संयमाने सामोरे जाऊन शांतपणे लिहावे हे तसं कठीणच. पण शिक्षकांनी स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केलेला हा एक लेखनाचा प्रयत्न, तुम्ही गोड मानून घ्याल व त्याचे स्वागत कराल ही अपेक्षा. श्री. घार्गे सरांच्या कवितेने ह्या मालिकेची सुरुवात होत आहे.

------------------------------------------------
जीवन

हजारो सुखं कमी असतात
एक दुःख विसरायला.
पण एकच प्रेमळ शब्द आवश्यक असतो
दुःखमय जीवन जगण्याला.

हजारो फुलं कमी असतात
एका नव्या नवरीला सजवायला.
पण एकच फूल आवश्यक असते
मंदिरात देवाला वाहायला.

हजारो मित्र कमी असतात
मौज-मस्ती करायला.
पण एकच मित्र आवश्यक असतो
जीवनात दोस्ती टिकवायला.

हजारो बगिचे कमी असतात
माणसांना फिरायला.
पण एकच कब्रस्थान आवश्यक असते
आरामशीर झोपायला.

हजारो शाळा कमी असतात
मुलांना शिकायला.
पण विद्यामंदिरच आवश्यक आहे
आदर्श विद्यार्थी घडवायला.

श्री. घार्गे सर

2 comments:

HAREKRISHNAJI said...

स्तुत उपक्रम. बॉग छान आहे

sneha said...

chan aahe kavita