ह्या महिन्याच्या सात तारखेला नटूनथटून आलेल्या मुलामुलींनी विद्या मंदिरचा परिसर गजबजून गेलेला होता. समारंभ होता, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा. सर कोण आणि विद्यार्थी कोण किंवा मॅडम कोणत्या आणि विद्यार्थिनी कोणत्या हे चटकन समजून येत नव्हते. गलबला होता "तरुण प्रौढांचा.'
पूर्वपरीक्षा झाल्यामुळे जराशी मोकळी झालेली मुलं पुन्हा अभ्यासाला जुंपून घेण्यापूर्वी "जिवाची शाळा' करण्यासाठी शाळेत आली होती, शाळेचा निरोप घ्यायला. सूत्रसंचालन करणारी ऋतुजा फडके किंवा श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्याकडे शाळेसाठी निधी सुपूर्द करताना दिसत असलेला प्रथमेश गायतोंडे, ही झाली मुलांच्या उत्साहाची प्रातिनिधिक उदाहरणे.
सद्गदित झालेले विद्यार्थी आणि गहिंवरलेपण लपवू पाहणारी शिक्षक मंडळी समारंभात उत्साहाने मिरवीत असली तरी समारंभाला असलेली कातरतेची झालर लपत नव्हती. 'Parting is such a sweet sorrow' असे कोणे एके काळी "51 टेस्ट पेपर्स'नी घासून गुळगुळीत केलेले वाक्यही अर्थवाही वाटावे असे वातावरण होते.
ह्यावर्षीच्या निरोप समारंभाचा आणखी एक विशेष म्हणजे मुलांनी शाळेला केलेली भरघोस मदत. इंग़्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एकंदर रु.37,504/- तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एकंदर रु. 21,357/- शाळेला दिले ! निरोप समारंभांना विविध वर्षी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या भेटींमध्ये आजपर्यंतची ही सर्वात मोठी भेट होती ह्यात शंकाच नाही. सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मनःपूर्वक धन्यवाद.
विद्या मंदिरच्या ह्या अनुदिनीतर्फे आम्ही शालांत परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना अनेकोत्तम शुभेच्छा देतो. शालांत परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांकडे असेलच, पण पालकांना ते पडताळून पाहायचे असेल तर ते येथे पाहता येईल.
मुलांनी अनेक प्रश्नपत्रिका गोळा करून सोडविलेल्या असतील आणि अजूनही हे सुरूच असेल. पण धास्तावलेल्या पालकांना हे पुरेसे वाटत नसेल तर त्यात भर घालायलाही आम्ही तत्पर आहोत. दरवर्षी एसएससी बोर्डातर्फे "स्वाध्याय' प्रकाशित करण्यात येतात. अनेकांना ते VVIMP वाटतात. हे स्वाध्याय तुम्हाला तुमच्या माध्यमानुसार आणि विषयाच्या निकडीनुसार निवडून येथून डाऊनलोड करता येतील. ज्यांना ह्या स्वाध्यायांच्या प्रती हव्या असतील त्यांना झेरॉक्सचा खर्च देऊन त्या सोमवार दि. 16 फेब्रुवारीपासून शाळेच्या वाचनालयातून मिळू शकतील.
No comments:
Post a Comment