नवीन वर्षात आपल्याशी प्रथमच या पत्राद्वारे संवाद साधीत आहे. हुरहुर आहे ती दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीला आपली भेट न झाल्याची.
दरवर्षी आपण अत्यंत उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. मान्यवरांच्या हस्ते झालेले झेंडावंदन, वेगवेगळे रंगतदार कार्यक्रम, विद्यार्थांची परेड, बक्षीस वाटप आणि आपल्या अगत्याच्या उपस्थितीने साजरे झालेले मागचे सारे प्रजासत्ताक दिन आपणा सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिले असतील. अपवाद होता, या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा. या वर्षी आम्ही तुम्हाला या समारंभात सामील होण्यासाठी नाही बोलावू शकलो. म्हणूनच ही दिलगिरी. कारण तुम्हाला माहीत आहेच, नवीन इमारतीच्या बांधकामामुळे सर्वाना सामावून घेण्याइतकी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे ह्या वर्षी हा समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही. निधी संकलन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी शरीरसंपदेची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले.
या शैक्षणिक वर्षात नेहमीप्रमाणे आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. विशेष सांगण्याजोगे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून इंटरनेटवर ब्लॉग सुरू केला आहे. http://vpmdahisar.blogspot.com असा ह्या ब्लॉगचा पत्ता आहे. या ब्लॉगमध्ये मुलांनी, शिक्षकांनी लिहिलेले लेख तसेच शाळेसंदर्भात माहिती उपलब्ध आहे. आपण या ब्लॉगला भेट द्यावी, तसेच आपल्या पाल्याला या ब्लॉगवर लिहिण्यास प्रोत्साहित करावे. याचबरोबर www.vpmdahisar.com ही शाळेची वेबसाईटही निर्माण करण्यात आली आहे. आपण आर्वजून या वेबसाईटला भेट द्या आणि आपली नोंदणी करा. आपल्या सूचनांसाठी वेबसाईटचा उपयोग करा.
शाळेच्या नवीन इमारतीचे पहिल्या टप्प्याचे काम जोरात सुरू झालेले आहे. साधारणतः यावर्षीच्या जूनपर्यंत काही वर्ग आपण नव्या इमारतीत नेऊ शकू असा विश्वास आहे. पहिला टप्पा 2009 मध्ये पूर्ण होईल. चिंता आहे ती दुसर्या टप्पाच्या बांधकामाच्या खर्चाची. वेळोवेळी आपण उदारहस्ते केलेल्या आर्थिक मदतीची जाणीव आम्हा संचालक मंडळास आहे. त्यातूनच उभी राहत असलेल्या इमारतीच्या बांधकामाचे हे चित्र आपल्या माहितीसाठी आम्ही सोबत दिलेले आहे.
पण आता वेळ आली आहे ती पुन्हा एकदा आपणा सर्वांना साद घालण्याची. पुन्हा एकदा विद्यामंदिरसाठी तुम्हाला विनंती करण्याची. आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्याची. पैसा उभा करण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत. वेगवेगळया ट्रस्ट्सना, आर्थिक संस्थांना आम्ही भेटतो आहोत. देणग्याही मिळताहेत. परंतु गरज मोठी आहे. निधीसंकलनासाठी कृपया आपला सहयोग द्या. आणि तुमच्या छोट्या छोट्या वैयक्तिक देणग्यांमधूनही फार मोठी मदत होऊ शकते.
कृपया ह्या एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हा. तुमच्या मित्रांनाही सहभागी करून घ्या.
कळावे, लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा.
आ. वि.,
ज. स. साळुंखे
अध्यक्ष,
विद्या प्रसारक मंडळ.
No comments:
Post a Comment