स्पर्श प्रेमाचा हव्याहव्याशा नात्याचा
लुसलुसणाऱ्या ओठांना मातेच्या स्तनाचा
इवलाल्या डोळ्यांना सचेतन सृष्टीचा
स्पर्श प्रेमाचा . . . . . .
नाजूकशा बोटांना खंबीर बाबांचा
धडपडणाऱ्या पावलांना सावरणाऱ्या ममतेचा
काऊ चिऊच्या गोष्टी अन गोड खाऊ देणाऱ्या
आजी आजोबांच्या सुरकुतल्या हातांचा
स्पर्श प्रेमाचा . . . .
बालमंदिरातील ताई, बाई व रिक्षावाल्या काकांचा
खेळ चित्र ग़ोष्टी गाणीच्या राज्यातील पऱ्यांचा
रूसणाऱ्या, फुगणाऱ्या गोबऱ्या गालांना
आश्वासक धीराचा स्पर्श वर्गशिक्षकांचा
स्पर्श प्रेमाचा . . . .
स्पर्श प्रेमाचा हक्काच्या बाकाचा
स्पर्श प्रेमाचा वह्या नि पुस्तकांचा
स्पर्श प्रेमाचा खडू नि फळ्याचा
स्पर्श प्रेमाचा अगणित आठवणींचा
स्पर्श प्रेमाचा शाळेच्या प्रांगणाचा
स्पर्श प्रेमाचा हव्याहव्याशा नात्याचा
स्पर्श युवास्थेचा खुदकन हसणाऱ्या मनाचा
क्षणात भावूक होणाऱ्या अलवार भावभावनांचा
हक्काच्या मैत्रीचा हक्काने गाजवणारा
स्पर्श प्रेमाचा . . . .
स्पर्श राजकुमाराचा, स्पर्श प्रियतमाचा
रेशीम स्पर्श मुलायम स्पर्श फक्त आपणा एकट्याचा
स्पर्श दरवळणाऱ्या सुवासाचा
स्पर्श उडणाऱ्या आकांक्षांचा
स्पर्श गगनातील ताऱ्याचा
स्पर्श विश्वातील ऐक्याचा
स्पर्श तुझा माझा
स्पर्श काळ्या गोऱ्याचा
स्पर्श विश्व कल्याणाचा
स्पर्श जीवनातील सत्याचा
प्रेमळ स्पर्श, बोचरा स्पर्श
गलिच्छ स्पर्श विदारक स्पर्श
स्पर्श स्पर्श करणाऱ्या हातांचा . . . . नव्हे . . .
स्पर्श स्पर्शाच्या भावनेचा.
- सौ. नेहा काळे
अध्यापिका, माध्यमिक इंग्रजी
No comments:
Post a Comment