Friday, February 27, 2009

मैत्री


मैत्री असावी निरंतरची
अंतापर्यंत एकमेकांना समजण्यासाठी
मैत्री असावी पणतीतील वातीसारखी
ज्योतीसाठी स्वत:ला समर्पित करणारी
मैत्री असावी दुधाच्या साईसारखी
वेगळ होऊन दुधाच अस्तित्व सांगणारी
मैत्री असावी जलाशयातील थेंबासारखी
स्वत:च अस्तित्व दुसऱ्यासाठी देण्यासाठी
मैत्री असावी गुलाबाच्या काट्यासारखी
स्वत: दु:ख झेलून दुसऱ्याला रिझवण्यासारखी
मैत्री असावी कस्तुरीमृग-कस्तुरी सारखी
स्वत:च्या गुणाने इतरांची ओळख देण्यासारखी
मैत्री असावी स्वत्व देऊन
एकमेकांची सुखदु:ख समजण्यासाठी
नसावी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी
असावी फक्त समर्पिततेची भावना
दुसऱ्याचे दु:खाने डोळ्यात अश्रू येण्यासाठी
दुसऱ्याच्या सुखात चेहऱ्यावर हसू येण्यासाठी
असावी तू माझ्यासाठी कोणीतरी आहेस खास सांगण्यासाठी
असावी ती तुझ्यात मी आणि माझ्यात तू बघण्यासाठी
असावी ती दृढ एकमेकांच्या विश्वासावर वृध्दिंगत व्हावी ती उत्तरोत्तर
नकोच कटूता नकोच मलीनता
असावी फक्त आणि फक्त निर्मळ आरशासारखी

(प्रेषिका : सौ. संध्या समुद्र)

Friday, February 13, 2009

शालान्त परीक्षेसाठी शुभेच्छा !

 

ह्या महिन्याच्या सात तारखेला नटूनथटून आलेल्या मुलामुलींनी विद्या मंदिरचा परिसर गजबजून गेलेला होता. समारंभ होता, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा. सर कोण आणि विद्यार्थी कोण किंवा मॅडम कोणत्या आणि विद्यार्थिनी कोणत्या हे चटकन समजून येत नव्हते. गलबला होता "तरुण प्रौढांचा.'

image

पूर्वपरीक्षा झाल्यामुळे जराशी मोकळी झालेली मुलं पुन्हा अभ्यासाला जुंपून घेण्यापूर्वी "जिवाची शाळा' करण्यासाठी शाळेत आली होती, शाळेचा निरोप घ्यायला. सूत्रसंचालन करणारी ऋतुजा फडके किंवा श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्याकडे शाळेसाठी निधी सुपूर्द करताना दिसत असलेला प्रथमेश गायतोंडे, ही झाली मुलांच्या उत्साहाची प्रातिनिधिक उदाहरणे.

सद्‌गदित झालेले विद्यार्थी आणि गहिंवरलेपण लपवू पाहणारी शिक्षक मंडळी समारंभात उत्साहाने मिरवीत असली तरी समारंभाला असलेली कातरतेची झालर लपत नव्हती. 'Parting is such a sweet sorrow' असे कोणे एके काळी "51 टेस्ट पेपर्स'नी घासून गुळगुळीत केलेले वाक्यही अर्थवाही वाटावे असे वातावरण होते. 

P1570299_Large_

ह्यावर्षीच्या निरोप समारंभाचा आणखी एक विशेष म्हणजे मुलांनी शाळेला केलेली भरघोस मदत. इंग़्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एकंदर रु.37,504/- तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एकंदर रु. image21,357/- शाळेला दिले ! निरोप समारंभांना विविध वर्षी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या  भेटींमध्ये आजपर्यंतची ही सर्वात मोठी भेट होती ह्यात शंकाच नाही. सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मनःपूर्वक धन्यवाद. 

विद्या मंदिरच्या ह्या अनुदिनीतर्फे आम्ही शालांत परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना अनेकोत्तम शुभेच्छा देतो. शालांत परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांकडे असेलच, पण पालकांना ते पडताळून पाहायचे असेल तर ते येथे पाहता येईल.

मुलांनी अनेक प्रश्नपत्रिका गोळा करून सोडविलेल्या असतील आणि अजूनही हे सुरूच असेल. पण धास्तावलेल्या पालकांना हे पुरेसे वाटत नसेल तर त्यात भर घालायलाही आम्ही तत्पर आहोत. दरवर्षी एसएससी बोर्डातर्फे "स्वाध्याय' प्रकाशित करण्यात येतात. अनेकांना ते VVIMP वाटतात. हे स्वाध्याय तुम्हाला तुमच्या माध्यमानुसार आणि विषयाच्या निकडीनुसार निवडून येथून डाऊनलोड करता येतील. ज्यांना ह्या स्वाध्यायांच्या प्रती हव्या असतील त्यांना झेरॉक्सचा खर्च देऊन त्या सोमवार दि. 16 फेब्रुवारीपासून शाळेच्या वाचनालयातून मिळू शकतील.

Monday, February 9, 2009

।। स्पर्श ।।

  

    स्पर्श प्रेमाचा हव्याहव्याशा नात्याचा
    लुसलुसणाऱ्या ओठांना मातेच्या स्तनाचा
    इवलाल्या डोळ्यांना सचेतन सृष्टीचा
    स्पर्श प्रेमाचा . . . . . .
            नाजूकशा बोटांना खंबीर बाबांचा
            धडपडणाऱ्या पावलांना सावरणाऱ्या ममतेचा
            काऊ चिऊच्या गोष्टी अन गोड खाऊ देणाऱ्या
            आजी आजोबांच्या सुरकुतल्या हातांचा
            स्पर्श प्रेमाचा  . . . .
    बालमंदिरातील ताई, बाई व रिक्षावाल्या काकांचा
    खेळ चित्र ग़ोष्टी गाणीच्या राज्यातील पऱ्यांचा
    रूसणाऱ्या, फुगणाऱ्या गोबऱ्या गालांना
    आश्वासक धीराचा स्पर्श वर्गशिक्षकांचा
    स्पर्श प्रेमाचा  . . . .
            स्पर्श प्रेमाचा हक्काच्या बाकाचा
            स्पर्श प्रेमाचा वह्या नि पुस्तकांचा
            स्पर्श प्रेमाचा खडू नि फळ्याचा
            स्पर्श प्रेमाचा अगणित आठवणींचा   
            स्पर्श प्रेमाचा शाळेच्या प्रांगणाचा
            स्पर्श प्रेमाचा हव्याहव्याशा नात्याचा
    स्पर्श युवास्थेचा खुदकन हसणाऱ्या मनाचा
    क्षणात भावूक होणाऱ्या अलवार भावभावनांचा
    हक्काच्या मैत्रीचा हक्काने गाजवणारा
    स्पर्श प्रेमाचा  . . . .

            स्पर्श राजकुमाराचा, स्पर्श प्रियतमाचा
            रेशीम स्पर्श मुलायम स्पर्श फक्त आपणा एकट्याचा
            स्पर्श दरवळणाऱ्या सुवासाचा
            स्पर्श उडणाऱ्या आकांक्षांचा
            स्पर्श गगनातील ताऱ्याचा
            स्पर्श विश्वातील ऐक्याचा
            स्पर्श तुझा माझा
            स्पर्श काळ्या गोऱ्याचा
            स्पर्श विश्व कल्याणाचा
            स्पर्श जीवनातील सत्याचा
        प्रेमळ स्पर्श, बोचरा स्पर्श
        गलिच्छ स्पर्श विदारक स्पर्श
        स्पर्श स्पर्श करणाऱ्या हातांचा . . . . नव्हे  . . .
        स्पर्श स्पर्शाच्या भावनेचा.

              

                 - सौ. नेहा काळे
                अध्यापिका, माध्यमिक इंग्रजी

Monday, February 2, 2009

वास्तुप्रवेश

रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2009 हा आपल्या शाळेच्या इतिहासातला एक हृद्य दिवस म्हणून स्मरणात राहणार आहे. शाळेच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहात श्री गणेश आणि श्री सरस्वति ह्या विद्येच्या देवतांचे विधिवत्‌‌ पूजन करून प्रवेश करण्यात आला.

IMG_6439_copya

मंडळाचे आद्य अध्यक्ष कै. श्री. अप्पासाहेब ठाकरे ह्यांचे चिरंजीव आणि सध्या मंडळाचे खजिनदार असलेले श्री. प्रफुल्ल ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. क्षमा ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते ही पूजा करण्यात आली. सोबतच्या चित्रामध्ये मंडळाचे संकुल प्रमुख श्री. सदाशिव परांजपे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शैला परांजपे शुभप्रवेशप्रसंगी ठाकरेदंपतीचे स्वागत करताना दिसत आहेत.

P1570055_copya

हा सोहळा पाहण्यासाठी श्री. सुरेश ठाकूर ह्यांचे पार्ले टिळक विद्यालयातील शिक्षक आणि आपल्या शाळेचे देणगीदार श्री. साने सर आवर्जून उपस्थित होते.

दरवर्षी गाजणारा बालोद्यानातील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आवडीचा बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा सोहळा नंतर ह्या सभागृहात उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमासाठी नवी वास्तू उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक-शिक्षकेतरांच्या उत्साहाला उधाण आले होते.

IMG_6463_copya

ह्या प्रसंगी श्री. विक्रम ठाकरेश्री. कौस्तुभ ठाकरे ह्या ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीतील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे रु.1,00,001/- रुपयांची देणगी घोषित करण्यात आली.

शाळेचे आणखी एक आदर्श माजी विद्यार्थी श्री. विजय यशवंत म्हसकर ह्यांच्यातर्फे रु.50,000/- रुपयांची तर बालोद्यान शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. मेधाविनी कुलकर्णी ह्यांच्यातर्फे रु.25,000/- ची देणगी देण्यात आली.

श्री. विकास पाटणेकर, श्री. राहुल केळकर, श्री. निशिकांत हंबीर आणि श्री. गांधी ह्यांनीही देणग्या दिल्या. जय व जाई ह्या बाहुला-बाहुलीच्या लग्नानिमित्त अशा रीतीने घसघशीत अहेर मिळाला.

इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ, बालोद्यानाचे शिबिर आणि इ.4 थी चे निवासी शिबिर हे कार्यक्रमही लवकरच ह्या सभागृहात आयोजित होणार आहेत.

छाया – श्री. निशिकांत हंबीर

Sunday, February 1, 2009

अध्यक्षीय निवेदन

नवीन वर्षात आपल्याशी प्रथमच या पत्राद्वारे संवाद साधीत आहे. हुरहुर आहे ती दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीला आपली भेट न झाल्याची.

दरवर्षी आपण अत्यंत उत्‍साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. मान्यवरांच्या हस्ते झालेले झेंडावंदन, वेगवेगळे रंगतदार कार्यक्रम, विद्यार्थांची परेड, बक्षीस वाटप आणि आपल्या अगत्याच्या उपस्‍थितीने साजरे झालेले मागचे सारे प्रजासत्ताक दिन आपणा सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिले असतील. अपवाद होता, या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा. या वर्षी आम्ही तुम्हाला या समारंभात सामील होण्यासाठी नाही बोलावू शकलो. म्हणूनच ही दिलगिरी. कारण तुम्हाला माहीत आहेच, नवीन इमारतीच्या बांधकामामुळे सर्वाना सामावून घेण्याइतकी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे ह्या वर्षी हा समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही. निधी संकलन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी शरीरसंपदेची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले.

P1560373_Medium_

या शैक्षणिक वर्षात नेहमीप्रमाणे आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. विशेष सांगण्याजोगे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून इंटरनेटवर ब्लॉग सुरू केला आहे. http://vpmdahisar.blogspot.com असा ह्या ब्लॉगचा पत्ता आहे. या ब्लॉगमध्ये मुलांनी, शिक्षकांनी लिहिलेले लेख तसेच शाळेसंदर्भात माहिती उपलब्ध आहे. आपण या ब्लॉगला भेट द्यावी, तसेच आपल्या पाल्याला या ब्लॉगवर लिहिण्यास प्रोत्‍साहित करावे. याचबरोबर www.vpmdahisar.com ही शाळेची वेबसाईटही निर्माण करण्यात आली आहे. आपण आर्वजून या वेबसाईटला भेट द्या आणि आपली नोंदणी करा. आपल्या सूचनांसाठी वेबसाईटचा उपयोग करा.

शाळेच्या नवीन इमारतीचे पहिल्या टप्‍प्याचे काम जोरात सुरू झालेले आहे. साधारणतः यावर्षीच्या जूनपर्यंत काही वर्ग आपण नव्या इमारतीत नेऊ शकू असा विश्वास आहे. पहिला टप्पा 2009 मध्ये पूर्ण होईल. चिंता आहे ती दुसर्‍या टप्‍पाच्या बांधकामाच्या खर्चाची. वेळोवेळी आपण उदारहस्ते केलेल्या आर्थिक मदतीची जाणीव आम्हा संचालक मंडळास आहे. त्यातूनच उभी राहत असलेल्या इमारतीच्या बांधकामाचे हे चित्र आपल्या माहितीसाठी आम्ही सोबत दिलेले आहे.

Picture 003

पण आता वेळ आली आहे ती पुन्हा एकदा आपणा सर्वांना साद घालण्याची. पुन्हा एकदा विद्यामंदिरसाठी तुम्हाला विनंती करण्याची. आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्याची. पैसा उभा करण्याचे आमचे प्रय‍त्‍न सुरूच आहेत. वेगवेगळया ट्रस्ट्‌‌सना, आर्थिक संस्थांना आम्ही भेटतो आहोत. देणग्याही मिळताहेत. परंतु गरज मोठी आहे. निधीसंकलनासाठी कृपया आपला सहयोग द्या. आणि तुमच्या छोट्या छोट्या वैयक्तिक देणग्यांमधूनही फार मोठी मदत होऊ शकते.

कृपया ह्या एका महत्त्‍वाच्या सामाजिक कार्यात सहभागी व्‍हा. तुमच्या मित्रांनाही सहभागी करून घ्या.

कळावे, लोभ आहेच. वृद्धिंगत व्‍हावा.

आ. वि.,

ज. स. साळुंखे

अध्यक्ष,

विद्या प्रसारक मंडळ.