मातृदेवो भव । पितृदेवो भव ।
भारतीय संस्कृतीचा ठेवा, हे आता फक्त लिहून वाचण्यापर्यंत शिल्लक राहिलेले आहे. पण आजचा विद्यार्थी खरेच असा का बनत चालला आहे? याचा खोलवर विचार केल्यास भूतकालीन आयुष्याची चित्रे उलगडून स्मरणात येते की, पूर्वी एकत्र कुटुंबामुळे आईचे नाते, बाबांचे नाते सहवासातून, स्पर्शातून, संवादातून गहिरे असायचे. मुलांना आई-वडिलांची ओढ असायची. आई कितीही कामात असली तरी ‘घार उडते आकाशी मन असे पिल्लाशी’ म्हणीप्रमाणे आई मुलांची नजरानजरही गोड वाटायची.
आजची स्थिती आई, बाबा, दोन मुले असे विभक्त कुटुंब त्यात आई-बाबा दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर. पाल्यासाठी वेळ देऊ शकतो का? पाल्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण असण्यासाठी आपण कोठे कमी पडता? पैशाने सर्व सुखे मिळत नाहीत. काही वेळा शब्दांचा दिलासा, कौतुकाची थाप व मुलांच्या कुतुहल बुद्धीचे, शंकांचे निरसन या गोष्टींचेही पालकांनी पाल्याचे स्वागत करावे. कधी रागावणे, कधी धाक दाखवणे, कधी त्याचा मित्र बनून खेळणे, कधी त्याचा नवीन विषयाचा अभ्यास घेणे, निदान शाळेतलाच अभ्यास पुन्हा घेऊन पक्का करणे, हे महत्त्वाचे आहे.
आजच्या शिक्षणात आणखी वाढते विषय भरीस पडले आहेत. जसे मूल्य शिक्षण, सामान्य ज्ञान, पर्यावरण, संगणक, व्यक्तिमत्त्व विकास शिक्षणाचा दर्जा उंचावत चाललेला आहे. उच्च स्तरावर शिक्षणाची पातळी वाढत चालली आहे. उंचावलेला हा वटवृक्ष फांद्यांचा एकमेव आधार आहे. शाळेत विद्यार्थी 5 ते 6 तास असतो. वर्गातील 70 ते 75 मुलांना काही-काही मिनिटांत तो विषय अभ्यासक्रमाप्रमाणे संपवायचा असे बंधन असते. मनात असूनही शिक्षकांना विषयांचे सविस्तर शिक्षण विद्यार्थ्यांना देणे वेळेअभावी शक्य नसते. अशावेळी 24 तासांतील 5 ते 6 तास शाळा, 8 तास झोप व उरलेल्या तासांत पालक काहीतरी वेळ पाल्यासाठी नियोजनपूर्वक मनात असेल तर काढू शकतात. सुट्ट्यांतही ते पाल्याला काही शिकवू शकतात. निदान नवीन विषयांची जाण पाल्याला अधिक माहितीपूर्वक देऊ शकतात. जरी शाळेत, शिकवणीत विद्यार्थी शिकत असला तरी घरच्या शिक्षणातही सहभाग असणे आजच्या स्पर्धात्मक युगात जरुरीचे आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्र्रम दाखवायला हवेच, पण सर्वच कार्यक्रम आवश्यक नाहीत. शैक्षणिक कार्यक्रम दाखविल्यास त्याचा फायदा होईल व इतर कार्यक्रमांचे दुष्परिणामही कमी होतील व वेळही सार्थकी लागेल.
पालकांनी आपल्या पाल्यासाठी शाळेत 15-15 दिवसांनी शिक्षकांना भेटायला हवे. पाल्याचे मित्र कोण? वर्गात त्याचे लक्ष कितपत असते? गृहपाठ वेळेवर करतो का? त्याचे वागणे, बोलणे, राहणे, आहार या सर्व बारीक गोष्टींतूनही पालकांनी जागृत असावे. घरच्या वातावरणातील संवाद एकमेकांसाठी सहकार्याची भावना, घरातील प्रत्येक माणूस कुटुंब, समाज, मग देश हे सारे माणुसकीचे माणूस म्हणून जगण्यासाठी, पुढची पायरी भविष्यकाळात उज्ज्वल दिशा होण्यासाठी आजची पिढी आजच्या भक्कम पायाचा खंबीर आधार, मजबूत मूल्यांच्या संस्काराचे शिक्षण हृदयात जतन करायला पाहिजे, तरच शिक्षणाचे उद्दिष्ट सफलपूर्ण होईल.
स्पर्धायुगातील टक्केवारीत सूडाची भावना व्यक्त होऊ न देता प्रत्येकाला स्पर्धा ही जीवनासाठी हितकारक आहे, अशी मनाची धारणा ठेवल्यास, समाधानाची शिदोरी पाल्यास दिल्यास पालकत्व चिरंतन मूल्यांचे वाटेल, यात शंका नाही. सरळ-सरळ जीवनाला सामारे जाण्याची ताकद निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे.
तत्त्वज्ञानाच्या उच्च भाषेपेक्षा प्रेमाची भाषा, आपुलकीची भावना जास्त जवळची वाटेल. आजचे शिक्षण विद्याथ्यांचे कुवतीबाहेरचे आहे. तरीही त्यांची कुवत व्यवस्थित असण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे जास्त गरजेचे आहे. चंदनासारखे झिजल्यावर सुगंध दरवळतोच, पण आधी झिजण्याची क्रिया व्हावी लागते.
मुले ही तर निरागस, निष्पाप असतात. त्यांना वेळीच घडवणे, आकार देणे हे पालकांच्या हातात असतो. जसे पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे व्यवस्थित खतपाणी घातल्यास पाल्यांची उज्ज्वल पहाट नक्कीच उजाडेल.
"मुले ही फुले" असे नेहमी नेहरूजी म्हणत. सुंदर फुले, गोड फळे मिळण्यासाठी आधी कष्ट करावे लागतात. मगच त्यांचा आस्वाद सुखकारक वाटतो. संस्कारांच्या खतपाण्याची जबाबदारी पालकांची असते.
आजचा विद्यार्थी पालक व शिक्षकांचा आदर तेव्हाच करील जेव्हा दोघांचेही त्याला मार्गदर्शन लाभेल. कितीतरी वेळा मुलांना यश मिळाल्यावर ते नेहमीच मुलाखतीत आपल्या आई-वडिलांचे व गुरुंचे श्रेय, आशीर्वाद म्हणूनच मी आज काही करू शकलो असे सांगतात. त्याचे कारण मुलांच्या अनुभवांतून त्यांचे उद्गार आनंदाने बाहेर पडतात. आई-वडिलांनाही मग मुलांबद्दल अभिमान वाटतो.
म्हणूनच सुजाण, सुशिक्षित, आदर्श पालकत्व होण्यासाठी पाल्याचे जीवन सार्थकी लावणे, त्यांच्या शिक्षणात हातभार लावणे पालकांची जबाबदारी व कर्तव्य आहे.
- सौ. श्वेता सं. संखे