- डॉ. सौ. वसुंधरा नाटेकरआपल्या सर्वांच्या, विशेषकरून आई-आजी झालेल्यांच्या एका जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. भरण-पोषणाची जबाबदारी निसर्गत:च स्त्रीवर्गाकडे आलेली आहे. या पृथ्वीतलावरील यच्चयावत् प्राणीमात्रांच्या, (म्हणजे मनुष्यप्राण्यासकट !) उदरभरणासाठी पृथ्वी म्हणजे जमीनच अन्नधान्य पिकवते. सर्वांचा भार सहन करणारी ही 'सर्वसहा पृथ्वी', ही वसुंधरा आपल्या सर्वांचेच पोषण करते, तशाच आपणही सर्वजणी आपले बाळ आपल्या गर्भात असताना आपल्या रक्तामांसाने त्याला पोसतो आणि तो जन्मल्या दिवसापासून अगदी आपल्या अखेरपर्यंत म्हणजे आपण म्हातारे होईपर्यंत एका गोष्टीविषयी सतत काळजीत असतो की आपला 'तो' किंवा 'ती' पोटभर जेवला की नाही ! कारण आपली मुले कितीही मोठी झाली तरी आपल्यासाठी ती मुलेच असतात, आणि आपल्यापेक्षा लहानच असतात. अगदी आपल्या कर्त्या मुलाची काळजी घेणारी त्याची हक्काची, प्रेमाची बायको आली तरी आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आई नेहमीच काळजीत असते !
थोडक्यात, काळानुसार आपल्या राहणीमानात, विचारात-आचारात कितीही बदल झाला तरी एक गोष्ट शाश्वत आणि सत्य आहे की मुलाने खाऊन पिऊन भरल्यापोटी ढेकर दिला तरी ते पाहून समाधानाचा नि:श्वास टाकणारी ती आईच असते. आणि लहान मुलांच्या बाबतीत म्हणाल तर आपले बाळ कटकट न करता पोटभर जेवले तर त्या तृप्तीचा पहिला ढेकर मनोमन देते, ती आईच ! अगदी दिवसाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटते !
लहान मुलांच्या बाबतीत भेडवसावणारे प्रश्र्न म्हणजे -माझा मुलगा अगदीच बारकुडा आहे, तो काही खात नाही, शेजारच्या राहुलपेक्षा अगदीच हाडकुळा आहे; माझा मुलगा भात-पोळी खात नाही, भाजी तर त्याला डोळ्यासमोर नको ! कोशिंबिरीला हात लावत नाही, कुठलंच फळ त्याला आवडत नाही; सारखी गोळ्या-चॉकलेटं खातो. डॉक्टर, त्याला भुकेसाठी काही टॉनिक लिहून द्या ना ! अभ्यासातही अगदीच 'ढ' आहे, एखादं बुध्दीचं टॉनिक आहे कां हो ?- या आणि कितीतरी प्रश्नांचे भुंगे आपल्या डोक्यात भिरभिरत असतात, त्यामुळे आपण अस्वस्थ होतो, त्याबद्दल आपण स्वत:च जवाबदार आहोत अशी समजूत करून अपराधीपणाची भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, हे खरे आहे, पण मी देखील तुमच्यापैकीच एक म्हणजे प्रथम आई आहे आणि जोडीला वैद्यकीय व्यवसायातील अनुभवाने आलेला काहीसा शास्त्रीय दृष्टीकोन आहे. 'आई' ही पालकत्वाची पहिली पदवी पार पडली आहे आणि आता 'आजी' च्या पद्व्युत्तर परीक्षेचा अभ्यास सुरू आहे तेव्हा ही सर्व जमेची बाजू धरून मी बोलणार आहे.
आजचा मूळ विषय आहे, 'मुलांचे आरोग्य'. विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक स्वास्थ्य नव्हे तर शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने मानसिक आरोग्याचा ही विचार करणे म्हणजे संपूर्ण आरोग्य ! काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चाललेली आपली सांयप्रार्थना आठवा -
'शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योति नमोस्तुते ।।हे दीपज्योती, मी तुला नमस्कार करते-कशासाठी ? शुभ-कल्याण करण्यासाठी, आरोग्य, धन-संपत्ती प्राप्त होण्यासाठी, दुष्टबुध्दीचा नाश करण्यासाठी ...! इथे 'आरोग्य' या शब्दाला किती प्राधान्य दिले आहे पहा ! कारण आरोग्य असेल, तर धन, संपत्ती ... सर्व आपोआप सहजपणे प्राप्त होते.
दुसरे एक वचन -'शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्।' म्हणजे सद्धर्माचे आचरण, धर्माची प्राप्ती करण्यासाठी शरीर हे मुख्य साधन आहे.
एकूण आरोग्याचे अनन्यसाधारण महत्व आपण सर्वजण ओळखून आहोत.
आज मुलांच्या शारीरिक आरोग्याविषयी चर्चा करूया. यामध्ये प्रामुख्याने मुलांचा आहार म्हणजे खान-पान सेवा, विहार म्हणजे त्यांचा व्यायाम, खेळ, झोप, विश्रांती, इतर आवड, छंद, त्यांचा आरोग्यदायी, स्वच्छतेच्या सवयी, सद्वर्तन... असे बरेच काही त्यात येते. अलीकडे मुलांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आजारांच्या प्रतिबंधक लसी (व्हॅक्सीन्स्) यांचाही त्यांच्या आरोग्यात महत्वाचा वाटा असतो. कारण या लसी म्हणजे मुलांची कवचकुंडले आहेत.
आपल्या जन्मापासून अखेरपर्यंत आपल्याला सात्म्य झालेली संवयीची गोष्ट म्हणजे आपले अन्न; किंबहुना या अन्नावरच आपण वाढत असतो. इथे एक महत्त्वाचा फरक तुमच्या लक्षात आणून द्यावासा वाटतो, तो म्हणजे वाढ आणि विकास या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आपण शब्दप्रयोग असा करतो- 'मुलांची शारीरिक वाढ' आणि 'मुलांचा सर्वांगीण विकास.' वाढ ही संख्यात्मक बाब आहे. म्हणजे शरीराची वाढ होते ती वजनात, उंचीत किंवा इतर अवयवांच्या आकारमानात मात्र विकास हा गुणात्मक आहे. मुलांची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांची मुख्य कार्य योग्य व चांगल्या प्रकारे होतात की नाही, यावर त्याच्या विकासाची गती अवलंबून असते. तात्पर्य म्हणजे आपल्याला आपल्या मुलाची शारीरिक वाढ आणि त्याच्या बुध्दीचा विकास चांगला व्हावा ही अपेक्षा असते. यासाठी मुलांच्या आहाराकडे जितक्या आपुलकीने आपण लक्ष देतो, तितक्याच कळकळीने त्याचा व्यायाम, खेळ, झोप, सवयी, छंद याकडेही डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.
आता आहाराविषयी जुजबी शास्त्रीय माहिती घेऊया. आपले शरीर कार्यरत राहाण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा आहारातून मिळते. आहारातील महत्त्वाचे घटक आपल्याला माहीत आहेत.
1. पिष्टमय पदार्थ-कर्बोदके-Carbohydrates
2. नत्रयुक्त पदार्थ-प्रथिने- Proteins
3. स्निग्ध पदार्थ -चरबी - Fats
4. जीवनसत्त्वे- Vitamines -अ,ब,क,ड,ई
5. क्षार- Minerals
6. पाणी- Water
या आहारघटकांचे प्रमुख कार्य- शरीराला ऊर्जा पुरवणे, शरीराची झीज भरून काढणे, शरीराची वाढ करणे, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे. थोडक्यात शरीरवाढीसाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी या सर्व घटकांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. ऊर्जा म्हणजे थोडक्यात इंधन शरीरव्यापारासाठी लागणारी उर्जा मोजण्याचे परिमाण म्हणजे कॅलरी. हा शब्द आपल्या परिचयाचा असेल. 1 लीटर पाण्याचे तपमान 10सेंटिग्रेडने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला आहारशास्त्रात कॅलरी म्ह्नणतात. श्रमाची कामे करणाऱ्याना बैठे काम करण्यांपेक्षा जास्त ऊर्जा/जास्त कॅलरी लागतात. आपल्या मुलांचे वय (31/2 ते 6 ) लक्षात घेता, यांची वाढ होत असताना ती सतत धावत-पळत-खेळत असतात. त्यांच्या दृष्टीने ते श्रमाचेच काम आहे. या वयात त्यांचे शरीरही झपाट्याने वाढत असते, त्यामुळे त्याना जास्त ऊर्जा लागते. ही ऊर्जा म्हणजेच कॅलरीज् ते आपल्या आहारातून घेत असतात. या वयातील मुलांची दिवसभराची गरज 1690 कॅलरीज ची असते.
1.पिष्टमय पदार्थ-कर्बोदके मिळणारे पदार्थ म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ग़ूळ, साखर, साबुदाणा, केळी, आंबा, द्राक्षे, सुकामेवा - यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
2.प्रथिने-दोन प्रकारची. वनस्पतिजन्य व प्राणिजन्य.
वनस्पतिजन्य म्हणजे कडधान्ये व डाळी पासून मिळणारी प्रथिने प्राणिजन्य म्हणजे मांस, मासे, अंडी, दूध यापासून मिळणारी प्रथिने. प्रथिनांमुळे शरीराची झालेली झीज भरून निघते व वाढ होते, शरीर सुदृढ होते, म्हणून याना Body builders म्हणतात.
3. स्निग्ध पदार्थ-चरबीयुक्त पदार्थ-सर्व तेले, लोणी, तूप, मांस, मासे, सुका मेवा.
यामुळे देखील शरीराची वाढ होते, शरीराची उष्णता राखली जाते, हार्मोन्सची निर्मिती, पेशींच्या बाह्य आवरणाची निर्मिती होते.
4.जीवनसत्त्वे-रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. शरीरक्रिया सुरळीतपणे पार पाडल्या जातात.
'अ' - गाजर, दूध, पालेभाज्या, लालभोपळा, पपई, आंबा यासारखी गडद रंगाची फळे.
'ब' - दूध, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, धान्यांचा कोंडा, कडधान्ये, सुकामेवा
'क' - लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, टोमॅटो
ड - दूध, दुधाचे पदार्थ, मासे, सूर्याचे कोवळे ऊन
ई - पालेभाज्या, तेलबिया, वनस्पतीजन्य तेले, सोयाबीन ,मका, गव्हांकुर
5. क्षार - लोह-(रक्तवाढीसाठी), कॅल्शियम(हाडे व दात मजबुती)
सोडियम, पोटॅशियम
6. पाणी - सर्व द्रवपदार्थ, रक्ताचा पातळपणा टिकवते, अन्नाचे पचन करण्यासाठी. तात्पर्य, या सर्व पदार्थांचा आपल्या आहारात समावेश हवा. अर्थात ऋतुमानानुसार शरीराला गरज असेल त्याप्रमाणे आहारात बदलही करावा लागतो.
आहाराविषयी एवढी माहिती घेतल्यानंतर या 31/2 ते 6 वर्षाच्या मुलांच्या आहाराविषयी सविस्तर बोलू.
दिवसभरात तीन वेळा पोटभर जेवण म्हणजे सकाळी भरपेट नाश्ता, दुपारी जेवण व रात्री जेवण आणि मधल्या वेळेचे खाणे दोन वेळा, असे एकूण दिवसभरात पाच वेळा मुलानी खावे. अर्थात त्यांच्या शाळेची आणि भुकेची वेळ यांची सांगड घालून आईने कल्पकतेने त्याची आखणी करावी. याबाबत आईसारखा मॅनेजमेंट गुरु दुसरा नाही !
सकाळचा नाश्ता पोटभरीचा हवा. त्यासाठी शिरा, उपमा, पोहे, घावन, परोठे देणे उत्तम. बरोबर एखादे केळे किंवा कोणतेही फळ दिले तरी चालेल. हो, दिवसभरात 1 तरी फळ मुलांच्या पोटात जायला हवे.
दुपारच्या जेवणात भात-वरण किंवा आमटी, पोळी-भाजी, कोशिंबीर, आठवड्यातून 2-3 वेळा आवडीची खीर किंवा मुरांबा द्यावा. इथे मला एक सुचवावेसे वाटते की, जेवणाचे ताट अशाप्रकारे वाढावे की ते बघताक्षणी मुलाला जेवावेसे वाटेल. म्हणजे ताटातील पदार्थांची रंगसंगती असावी . म्हणजे पांढरा भात -लालसर आमटी, डाव्या बाजूला काकडीची कोशिंबीर, उजवीकडे बटाट्याची पिवळी भाजी, तर कधी पांढऱ्या भातावर पिवळे वरण, डावीकडे लाल टॉमेटोची कोशिंबीर, उजवीकडे लाल रस्सा किंवा हिरवी भाजी... असे रंगीबेरंगी सजलेले ताट पाहून सर्वात प्रथम डोळे तृप्त होतात; मग त्याच्या वासाने घाणेंद्रिय तृप्त होते, मग रसना म्हणजे जीभ त्या अन्नाचा आस्वाद घ्यायला अधीर होते. मग हाताने स्पर्शाने ते सुखावत आणि पटपट जेवते ! एक राहिले; मुलाला जेवण्यासाठी बोलावणारी पहिली हाक प्रेमाची असेल तर ती ऐकून मुलाचे कर्णेंद्रिय ही सुखावते ! एकूण काय, तर मूल पंचज्ञानेंद्रियांनी जेवते आणि तेच त्याच्या अंगी लागते, कारण ते खरे तृप्त होते ! रात्रीचे जेवण दुपारप्रमाणेच पण थोडे फेरफार करून असावे, खूप उशिरा त्याला जेवायला देऊ नये. नाहीतर नीट पचन होत नाही.
आता मधल्या वेळच्या खाण्याचे लाडू रोज रोज मधल्या वेळी काय खायला द्यायचे हा यक्षप्रश्र्न असतो. मी असे सुचवेन की येता जाता खाण्यासाठी भाजलेले चणे-शेंगदाणे, कुरमुरे, घरी केलेली शेव, शेंगदाणा-खोबरे, तीळ, चण्याची डाळ, राजगिरा यांची चिकीचा किंवा साधा गूळ घालून केलेली चिक्की-यामधून चांगले प्रोटीन्स मिळतात. फ्रूटचाट; फळांमध्ये मोड आलेले मूग, उकडलेले हरभरे ,बटाटा, रताळे; कांदा-कोशिंबीर, मीठ-मिरपूड घालून केलेला मिक्स चाट; या सर्व वस्तूंमध्ये चुरमुरे व थोडी शेव घालून केलेला मिक्स चाट; या सर्व वस्तूंमध्ये चुरमुरे व थोडी शेव घालून किसलेले गाजर, कोथिंबीर, आंबटगोड चटण्या यापासून केलेले भेळ, ही देखील चटकदार लागते, मुलांना आवडते. याशिवाय भूकलाडू, तहानलाडू म्हणून प्रसिध्द असलेले गव्हाच्या कणकेचे गुळाच्या पाकात केलेले लाडू, गूळपापडी; खोबऱ्याच्या, गाजर-दुधीच्या वड्या; असे अनेक प्रकार आणि जोडीला लिंबू, कोकम,आवळा यांची सरबते ही अधून मधून देता येतील.
आपल्याला सोबत एका कागदावर,मला सुचलेल्या आणि वापरलेल्या काही झटपट पाककृती (खास मुलांसाठी करण्याच्या) लिहून दिल्या आहेत. त्यांचा हे वापर करावा.
मला माहीत आहे, तुम्ही म्हणाल, 'करता खूप येईल पण वेळ कु ठे आहे ?' पण आवड असेल तर सवड मिळते. पुरुषांच्या हृदयाचा मार्ग त्यांच्या उदरातून जातो, हे आपण सतत ऐकत आलो आहोत, पण मला वाटते, पुरुषांच्याच नव्हे तर सगळ्यांच्याच हृदयाचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. म्हणूनच मुलांच्या मनाचा ताबा घ्यायचा असेल तर आधी त्यांचा पोटोबा शांत करायला हवा. आपल्या वेळेचे थोडेसे नियोजन, आणि काही गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवली तर सगळे काही सुकर होते, हा माझा अनुभव !
आता मुलांना काय देणे टाळावे ते पाहू या - मुलाना आवडणारी बिस्किटे-चॉकलेट, गोळ्या, शीतपेये, हवाबंद केलेले फळांचे रस यामध्ये Preservatives म्हणून काही रासायनिक द्रव्ये टाकली जातात. त्यांची बऱ्याच मुलांना ऍलर्जी असू शकते. तसेच या रासायनिक प्रकिया करताना त्यातील पोषणद्रव्ये नाश पावतात. त्यामुळे ती अपायकारक असतात. फळांचे रस पिण्यापेक्षा फळ खाणे चांगले, कारण त्यामधून फायबर म्हणजे चोथा मिळतो, जो आपल्या शरीरशुद्धिसाठी आवश्यक असतो.
वेफर्स, फरसाण, फास्टफूड (पिझ्झा- वगैरे...) यामध्ये वापरलेली तेले व मीठ यांचे प्रमाण खूप असते आणि ते वाढत्या वयासाठी तसेच आरोग्यासाठी धोकादायक असते. म्हणून नेहमी देऊ नये. मात्र त्याविषयी craving म्हणजे खाण्याची तीव्र इच्छा टाळण्यासाठी मुलाला काही खास प्रसंगी, अधून -मधून गमंत म्हणून द्यायला हरकत नाही.
डायबेटीस, ह्रदयविकार, उच्चरक्तदाब या जीवघेण्या व्याधीची पाळे-मुळे, बीजे, लहान वयातच पेरलेली असतात. त्याला कारण म्हणजे खाण्यापिण्यातील असमतोल म्हणजेच संतुलित आहार ( Balance diet) न घेणे, जंकफूड-फास्टफूड म्हणण्यापेक्षा नाहक भीती, टी.व्ही-व्हिडिओ-कंप्यूटर यांचा अतिप्रभाव !
तेव्हा आपले मूल भविष्यात अशा गंभीर आजाराना बळी पडू नयेत म्हणून या लहान वयातच त्याना दैनंदिन जीवनातील खाण्यापिण्याच्या, वागण्याच्या, अारोग्याच्या चांगल्या संवयी लावल्या पाहिजेत कारण साधारण 3 ते 8-10 वर्षापर्यंतचा क़ाळ म्हणजे मुलांचे अत्यंत संवेदनाक्षम, संस्कारक्षम असे वय. या वयात वयात ते जे आत्मसात करतील त्यावर त्याच्या उभ्या आयुष्याची इमारत उभी असते.
आहारानंतर येतो तो व्यायाम म्हणजे खेळ. हे वयच खेळण्या बागडण्याचे असते. त्यामुळे रोज संध्याकाळी किमान एक तास तरी मूल मोकळ्या हवेत खेळले पाहिजे. त्यामुळे होणाऱ्या व्यायामामुळे त्याचे स्नायू, सांधे, हाडे बळकट, मजबूत होतात, भरपूर प्राणवायू मिळाल्याने रक्ताभिसरण सुधारते. पेशी ताज्यातवान्या होऊन कामाचा (म्हणजे मुलांच्या अभ्यासाचा) उत्साह वाढतो. मन प्रसन्न राहाते. साहाजिकच त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर चांगलाच होतो. त्यांची आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते. याशिवाय सर्वांशी मिसळून राहिल्याने सहभावना, सहकार म्हणजे मदतीची भावना, समंजसपणा, सहनशीलता, वाढते. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे.
विश्रांती -याचीही मुलाना गरज असते. त्याच्यासाठी झोप हीच विश्रांती. झोपेमुळे मुलांच्या थकलेल्या शरीराला विश्रांती मिळते आणि मेंदू आपले काम उत्तम प्रकारे करण्यासाठी सज्ज होतो. या वयातील मुलांसाठी कमीत कमी 8 तास झोप हवीच. झोप पूर्ण झाली तर त्याचा बुध्दीवर चांगला परिणाम होतो; पर्यायाने अभ्यास चांगला होतो. तसे दिवसा झोपणे आरोग्यासाठी हितकर नाही, मात्र 31/2 -4 वर्षाच्या मुलानी दुपारी 1-11/2 तास झोपावे हे उत्तम. सध्याच्या ग्रीष्म ऋतूत सर्वांनीच 1/2 तास झोपावे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
या वयातच मुलाना हळूहळू वाचनाची सवय लावावी. स्तोत्रे, प्रार्थना, उजळणी या कालबाह्य होत चाळेेलल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते. कारण स्तोत्रपठण, उजळणी यामुळे आपली स्मरणशक्ती शाबूत राहाते, वाणी स्वच्छ-शुध्द होते.
आता आरोग्यदायी संवयीविषयी बोलताना प्रथम जेवणासंबंधी सांगते
* मुलाला भूक लागली असेल तेव्हा आणि तेव्हाच त्याला जेवायला , खायला द्यावे. भूक नसताना किंवा भुकेची वेळ टळून गेल्यानंतर खायला देऊ नये.
* मूल जेवत असताना त्याच्या अभ्यासासारखा अप्रिय विषय किंवा अन्य कारणाने त्यावर तोंडसुख घेऊ नये. त्यामुळे मूल नाराज झाले तर पाचकरस निर्माण होण्यात अडथळा येऊन पचन नीट होत नाही.
* मुलाला घाईघाईत खाण्याची संवय लावू नये. तसेच अगदी रेंगाळत जेवणेही चांगले नाही.
* दिवसभरातील एक तरी जेवण सर्व कुटुबीयांबरोबर होईल असे पहावे.
* "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' याचे भान ठेवावे !
आरोग्यदायी संवयीमध्ये दांताची काळजी महत्त्वाची आहे.
* दिवसातून 2वेळा म्हणजे सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी असे 2 वेळा दात घासण्याची संवय मुलाला लावावी.
* काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरावी.
* चिकी किंवा गोळीचॉकलेट सारखे गोड व चिकट पदार्थ खाल्ल्यावर मुलाचे दात घासून खळखळून चूळ भरावी.
* कुटुंबातील प्रत्येकाने ही शिस्त सांभाळावी.
* दर 6 महिने/1 वर्षाने दंतवैद्यांकडून मुलाचे दात तपासून घ्यावेत.
अन्य संवयी -
मुलाचे/मुलीचे केसांवर तेल घालून विंचरून भांग पाडून/वेणी घालून शाळेत किंवा बाहेर पाठवावे.
नखे नियमितपणे कापावीत.
मुलांच्या कानांची स्वछता करावी.
मुलांना दररोज दूध पिण्याची संवय असेल तर उत्तमच परंतु एखाद्या मुलाला दुधाचा तिटकारा असेल तर त्याला दुधासाठी फार आग्रह धरू नये. मात्र इतर आहार व्यवस्थित आहे ना, याकडे लक्ष द्यावे.
मुलांच्या आरोग्याविषयी बोलू तेवढे थोडेच आहे. एवढे मात्र निश्र्चित की त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर भविष्यात काळजी करण्यासारखे काही उरणार नाही, कारण लहानपणीचे जपलेले आरोग्य ही त्याची आयुष्यभराची शिदोरी असेल !