जेव्हा स्वप्न साकार होते तेव्हा मनात येणाऱ्या भावभावना अवर्णनीय असतात. हे खरंच प्रत्यक्षात आलंय का असं वाटत राहतं. विशेषतः एखादा उराशी बाळगलेला ध्यास साध्य झाला की स्वत:ला ओतून घेतल्यावर येणारं प्रसन्न रितेपणही आनंदासोबत असतं.
साडेबारा कोटी रु पये खर्चाच्या प्रकल्पाला ज्यावेळी मराठी शाळा चालवणारी किंवा मराठी वळणाची इंग्रजी शाळा चालवणारी माणसं हात घालतात त्यावेळी त्यांना बहुतेकांनी वेडात काढलेलं असतं. ‘शाळा बांधताय की मॉल?’ अशासारखी शंकेखोर वक्तव्यं सहन करीत जेव्हा काही ‘पछाडलेली’ मंडळी स्वतःला या कामात झोकून देतात तेव्हा साकारतं एक नवल.
दहिसरच्या विद्या मंदिर शाळेत 14 जूनला जेव्हा मुलांनी शाळेच्या नव्या वर्गांमध्ये प्रवेश केला तेव्हा असंच नवल प्रत्यक्षात घडलं. 600 चौ.फुटांचे भव्य वर्ग, 4’x16’ लांबीचे मॅग्नेटिक ग्रीन बोर्डस्, 1’x3’x16’ आकाराचे प्लॅटफॉर्म्स, ही आहे या शाळेची एक झलक.
प्रत्येक वर्गात, प्रत्येक मजल्यावर भरपूर मोकळी जागा आहे. पश्चिमेकडून आणि नैऋत्येकडून येणारा वारा आहे आणि उत्तरेकडून येणारा मोकळा प्रकाश! साऱ्या बाळगोपाळांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. नाचत, उड्या मारत वर्गात शिरणाऱ्या मुलांचा निर्व्याज आनंद पाहण्यासारखा होता.
ह्या स्वप्नपूर्तिसाठी जीवापाड कष्ट केलेली शिक्षक मंडळी हरखून गेलेली हो ती.
‘सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम् । असं म्हणण्याचे दिवस आता गेले आहेत. चिंचोळ्या गल्लीबोळातला प्रत्येक ‘कोचिंग क्लास’ आता ‘एसी’ असावा लागतो. अशा व्यापारी शिक्षणाशी स्पर्धा करण्यासाठी शाळेतल्या शिक्षकांची उमेद आता नक्कीच वाढलेली आहे.
हे नवल घडवलंय मुख्यतः ह्या शाळेच्या पालकांनी. अनेक वर्षे ह्या पालकांनी पदरमोड करून निधी उभारला. ‘आमच्या मुलांना तर काही नवी शाळा मिळण्याची शक्यता दिसत नाही’ असा कोतेपणाचा विचार केला नाही. अनेक दानशूर आणि समाजहितैषी सज्जनांनी हातभार लावला. शाळेचे नव्या दमाचे माजी विद्यार्थी संचालकांच्या खांद्याला खांदा लावून सरसावले आणि पत्र्याखाली तापणारी मुलं सुखद गारवा देणाऱ्या छत्राखाली नेण्याचं स्वप्न साकार झालं.
लवकरच शाळेच्या आवारातील कच्च्या इमारती पाडून मैदान मोकळे केले जाईल. शाळेचे बालोद्यान तळमजल्यावर असून बालोद्यानाच्या नव्या स्वरूपाबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणारच आहोत. शाळेच्या इमारतीच्या केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे तर अभ्यासक्रमातही गुणात्मक सुधारणा करण्याचा निश्चय शिक्षकांनी केलेला आहे. केवळ शालांत परीक्षेचा निर्णय चांगला लागतो आहे ह्यावर समाधान न मानता मुलांना फक्त परीक्षार्थी न करता खरेखुरे विद्यार्थी करण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले आहे.
अनेकांचं ऋण शिरावर घेऊन हा टप्पा गाठलेला आहे. शाळेच्या प्रस्तावित इमारतीचा उरलेला निम्मा भागही अजून बांधायचा आहे. तोही तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं लवकरात लवकर बांधून होईल यात शंका नाही.
(छायाचित्रे : निशिकांत हंबीर)