प्रास्ताविक
आमच्या ‘वि.प्र.मं’ ‘च्या संकुलातील इंग्रजी व मराठी माध्यमातील बालोद्यान, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने लेखन संकलन केलेले आमचे 2008-2009 या शैक्षणिक वर्षातील पृथ्वी हे हस्तलिखित जिज्ञासू व निसर्गप्रेमी वाचकांच्या हाती देताना आम्हांस
मनस्वी आनंद होत आहे.
‘माता भूमि: पुत्रोऽहं पृथ्विव्याम् ।’ हे अथर्ववेदातील वचन -याचा अर्थ भूमी माझी माता
असून मी त्या पृथ्वीचा पुत्र आहे. साऱ्या सजीवांचेच ती धारण करते, म्हणून तर तिला ‘धरणीमाता’
म्हणतात. शेतकऱ्यांची काळी आई ! अगदी जीवापाड प्रेम करतोे तिच्यावर ती काळी आईच त्याच्याजीवनाला जे जे आवश्यक ते ते सारे काही पुरविते. आपले जीवनसुद्धा शेतकऱ्यांवर अवलंबून आहे की ! पर्यायाने ही काळी आईच आपली सर्वांचीच माता आहे. तर बहुमोल संपत्ती (वसु) जिचेजवळ अमाप आहे. ती वसुंधरा व ही संपत्ती बाळगून ती स्वस्थ बसलेली नाही. तर आपल्या अब्जावधी पुत्रांना (सजीवांना) जगविण्यासाठी सुमारे 15 कोटी कि.मी. दूर असलेल्या व सतत प्रचंड आग ओकणाऱ्या सूर्याभोवती चटके सोशीत, ती स्वत:भोवती गिरक्या घेत फेऱ्या घालते आहे. क्षणाची ही गमंत नाही. तिच्या दैनंदिन परिवलनामुळे व वार्षिक परिभ्रमणामुळेच तर दिवस-रात्र आणि ऋतू होतात व त्यामुळेच सृष्टीतील जीवन गतिशील आहे. केवढे जाज्वल्य तिचे पुत्रप्रेम! किती महान आहे ही धरणीमाय ! सदर हस्तलिखिताच्या निमित्त्ताने या मातेला केलेले हे वंदन आहे.
या हस्तलिखितात पृथ्वीचा प्रत्येक अंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीचा जन्म, पृथ्वीचा प्रचंड आकार, तिच्या पृष्ठभागावरील आवरणे -जीवावरण, जलावरण, वातावरण,
शीलावरण तसेच मृदा निर्मिती, पृथ्वीच्या पोटातील खनिजसंपत्ती, उर्जासाधने इ. माहिती उपयुक्त आहे. पृथ्वीवरील विविध नैसर्गिक प्रदेश व तेथील भौगोलिक विविधता निसर्गशक्तीचा व निसर्गसौंदर्याचा प्रत्यय आणून देतात. तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्रापर्यंतची तिची अंतरंग
उलगडून दाखविण्यात आले आहे. तिच्यावरील बाह्य व अंतर्गत घडामोडींचाही यात विचार केला आहे.
आज आमची धरणीमाय-निसर्गाचे हे अमोल लेणे प्रदूषणग्रस्त झाले आहे. हवेचे,
पाण्याचे, मातीचे, ध्वनीचे तऱ्हेतऱ्हेच्या प्रदूषणांनी ती रोगग्रस्त झाली आहे. हिरवी-ओली चैतन्यदायी स्वप्ने पाहणारी आमची निलांबरी वसुंधरा उदास-खिन्न झाली आहे कारण तिच्या पुत्रांचे-सजीवांचे जीवन धोक्यात आहे !
पर्यावर्णविषयक जाणीव-जागृती निर्माण करणे व प्रत्येकाने तसे वर्तन करणे हा एक महत्वाचा विचार, एक प्रवृत्ती तसेच कृती हा एक महत्वाचा प्रयत्न या हस्तलिखितातून करण्यात आला आहे.
आमच्या विद्यार्थ्यांच्या लेखनात शक्य तेथे सांख्यिकी माहिती, आकृत्या, छायाचित्रे, नकाशे इ. समावेश केलेला आहे.
जय पृथ्वी देवते आई ।
तू आमची अन्नपूर्णा सर्वांची ।
जन्म-मृत्यू अन् जीवनधारा ।
साक्षी तू सर्वांची ।
मुख्याध्यापिका मा. सौ. सुर्वे मॅडम यांनी हस्तलिखितासाठी पृथ्वी या विषयाचा मनस्वी आग्रह धरला व त्या संदर्भात मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले व एका छान विषयाची कल्पना प्रत्यक्षात आकारली !
आमच्या बालोद्यान मराठी विभागाच्या प्रमुख सौ,जोशी मॅडम, प्राथमिक मराठी विभाग प्रमुख सौ.वर्तक मॅडम, प्रा.इंग्रजीच्या विभाग प्रमुख सौ.रॉड्रीग्ज मॅडम, माध्यमिक इंग्रजी विभाग प्रमुख सौ.पिल्ले मॅडम यांचे आम्हाला विशेष सहकार्य मिळाले. यांचे मन:पूर्वक आभार !
बालोद्यानपासून माध्यमिक विभागापर्यंत ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच परिश्रमपूर्वक अभ्यास करून ज्यांनी लेखन व संकलन केले ते आमचे गुणी विद्यार्थी यांचे मन:पूर्वक आभार !
तसेच या हस्तलिखिताची सजावट बांधणी यासाठी आमचे कला-शिक्षक श्री. एन.जी.पाटील सर यांनी अल्पावधीत परिश्रमपूर्वक व मनापासून हे काम पूर्ण केले त्यांनाही
धन्यवाद !
प्रास्ताविक म्हणून चार शब्द लिहिण्याची संधी मला मा.सौ सुर्वे मॅडम यांनी दिली त्यांचे पुन्हा मन:पूर्वक आभार !
सौ. पु.ज.वनमाळी
(सहशिक्षिका-मा.मराठी विभाग)
No comments:
Post a Comment