पायात घालतो घट्ट मोजे
पाठीवर माझ्या दप्तराचे ओझे
नविन आयुष्याचे स्वप्न रंगवत आहे
आणि तुमच्या मते अजुनही मी लहानच आहे?
सगळे विषय
शिकण्याचा ध्यास
सगळ्यातच
निपुण असण्याचा तुमचा अट्टहास
अपेक्षाचे
ओझे आता वाहतो आहे
आणि तुमच्या
मते अजुनही मी लहानच आहे?
रोज शिकावे काहीतरी नवे
सगळ्यातच तुम्हा पारितोषिक हवे
तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पळतो आहे
आणि तुमच्या मते अजुनही मी लहानच आहे?
अभ्यास,
क्रिडा, कला
काय हवय
विचारा तरी मला
तिघांची
सांगड घालतो आहे.
आणि तरीहि तुमच्या
मते अजुनही मी लहानच आहे?
सगळे म्हणे एकटं राहण्याची करावी मी सवय
त्यात येती स्वप्नात भीतीची वलय
डोळे घट्ट मिटून रात्र अर्धी जागवत आहे.
काय म्हणता अजुनही मी लहानच आहे?
नसे घरात
तुम्ही दहा ते पाच
घराचा जणू
मी चौकिदार
एकटा खिंड
मी लढवत आहे
आणि
तुमच्या मते अजुनही मी लहानच आहे?
मोठा कधी होणार? हे काय़ तुझं.
कधी तरी घ्या विचारात मत माझं
मनातच सगळं ठेऊन गप्प उभा आहे
आणि तुमच्या मते अजुनही मी लहानच आहे?
सौ. नेहांकी संखे
प्राथमिक इंग्रजी विभाग
सौ. नेहांकी संखे
प्राथमिक इंग्रजी विभाग