आमच्या बालोद्यान विभागात नवीन प्रवेश घेऊन आलेल्या छोट्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी जवळून परिचय व्हावा म्हणून एक स्वागत समारंभ रविवार दिनांक 19/07/2009 रोजी आयोजित केला होता. या समारंभाचे औचित्य साधून पालकांना त्यांच्या मुलांचा शारीरिक, मानसिक विकास योग्य तऱ्हेने करता यावा यासाठी बालरोग तज्ञ
डॉ. सौ. अंजली भाटवडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सुजाण पालकत्व या उपक्रमांतर्गत आयोजित केले होते. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते. या कार्यक्रमासाठी पालकांचा उत्तम प्रतिसाद होता.
सकाळी 9.30 वाजता पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. सुषमा प्रधान यांनी आपल्या मान्यवरांची ओळख करुन दिली. संयुक्त कार्यवाह श्री. जयंत गाडगीळ यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रकल्प समन्वय आरोग्य समितीच्या डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर यांनी पाहुण्यांचा थोडक्यात पण मुद्देसूद परिचय करून दिला. डॉ. सौ. अंजली भाटवडेकर या अनेक वर्ष बालरोग तज्ञ म्हणून काम करीत आहेत. विविध संस्थांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन पालकांना मार्गदर्शन करतात विलेपार्ले येथे वर्षातून 4 वेळा या प्रकारच्या कार्यशाळा घेतात. त्यानंतर पाहुण्यांना पालकांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
सकाळी 9.45 वाजता डॉ. सौ. भाटवडेकर यांनी व्याख्यानास सुरुवात केली.
‘‘या वयातील मुलांचे प्रश्न वेगवेगळे असतात. प्रत्येक आईला वाटते आपले मूल जेवत नाही. बारीक दिसते. अभ्यास करत नाही.प्रत्येक मुलाची शारीरिक, मानसिक जडणघडण वेगळी असते. सख्खी भावंडे असली तरी त्याच्या वाढीत, स्वभावात फरक असतो. त्यांना शारीरिक, मानसिक वाढीचे खूप टप्पे पार करायचे असतात. आपण प्रथम आहाराविषयी जाणून घेऊ. ’’
‘‘मूल बारीक दिसते म्हणून त्यांची दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करू नका. ते निरोगी व सर्वसामान्य आहे ना ते पहा. तो वारंवार आजारी पडत नाही, त्याच्या हालचाली योग्य आहेत, त्याचा विकास योग्य होतो आहे का ते पहा. या मुलांच्या प्रत्येक टप्प्यात त्याच्या वजनाची वाढ कमी जास्त होते. कधी त्याचे वजन वर्षाला अर्धा ते एक किलोपर्यंत वाढते तर कधी ते स्थिर रहाते. पण त्याचे वजन फार कमी होत नाही ना इकडे लक्ष द्यावे. त्यांना टॉनिक आवश्यक नसते. ( जर ते वारंवार आजारी पडत नसेल तर ) सर्दी खोकला हे मोठे आजार नाहीत. वारंवार ताप येणे, तो न उतरणे, पोट बिघडणे हे आजार असतील तर काळजी घ्या. या मुलांचा आहार समतोल असावा. एका कार्यशाळेत आहाराविषयी अभ्यास केला असता असे सिध्द झाले की महाराष्ट्रातील आहार हा समतोल व योग्य पध्दतीचा आहार आहे. त्यांच्या वाढीसाठी प्रोटीन्स लागतात. ती अंड्यामधून मुबलक प्रमाणात मिळतात म्हणून ज्या मुलांना अंडे आवडते त्यांना ते द्या. पण अंडे उकडून द्या. त्याच बरोबर चणे, शेंगदाणे, डाळी, कडधान्य व ड्रायफ्रुट यांतून प्रोटीन्स मिळतात.ज्वारी, बाजरी, तांदूळ यांतून कार्बोहायड्रेड मिळते. तेल, तूप यांतून स्निग्ध पदार्थ मिळतात. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करावा. जीवनसत्त्व अ हे केशरी रंगाच्या भाज्या, गाजर, भोपळा, पपई, आंबा यातून मिळते. ते डोळ्यांसाठी फार चांगले असते.जीवनसत्व ब हे भाज्या, फळे, अंडे यातून मिळते. जीवनसत्त्व क हे आंबट पदार्थ, लिंब, आवळा, संत्रे यातून मिळते. दातांसाठी व योग्य वाढीसाठी हे फार उपयुक्त आहे.
मुलांच्या पोटात चोथा म्हणजे फायबर हे गेले पाहीजे. त्यांना भाज्या, फळे खाण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना देणारा पदार्थ कल्पकतेने बनवा. पावभाजी, कटलेट, थालीपीठ, आंबोळी यांसारखे पदार्थ, कोशिंबीर, फ्रुटज्युस, मिल्कशेक हे देऊ शकता. या वयातील मुलांना फार दूध देऊ नये. मूल सहा महिन्यांचे झाल्यानंतर दूध नाही प्यायले तरी चालते. त्याला पहिले सहा महिनेच दुधाची गरज असते. मुलांना जे आवडते ते खाऊ दे. त्यांनी पोळीच खावी किंवा भातच खावा असा हट्ट करू नये. मुलांना त्यांचे पोट भरले की कळते. त्यांना आग्रह करून - फिरून भरवू नये. कुटुंबातील सर्वांनी शक्य असेल तेव्हा एकत्र बसून जेवावे. टी.व्ही.समोर बसून जेवायची सवय लावू नका. तसेच पालकांनीही टी.व्ही.चे कार्यक्रम बघत जेवू नये.
जंक फूड, मॅगी, वेफर्स, फरसाण हे पदार्थ वारंवार देऊ नये. या सर्व पदार्थांपासून कोणतेही आवश्यक घटक शरीरासाठी मिळत नाहीत. या उलट हे पदार्थ वारंवार खाण्यात आल्यास त्याचे दुष्परिणाम आढळतात. ( मॅगी खाल्यामुळे युरिनचा प्राब्लेम होऊ शकतो. मुले अस्थिर, चिडचिडी होतात.) या ऐवजी आपण मुलांना चिक्की, फळे, चणे, कुरमुरे, शेंगदाणे हे पदार्थ देऊ शकतो. या मुलांना गूळ जरुर द्यावा. गूळामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. बेकरीचे पदार्थ उदा. बिस्किट, टोस्ट, खारी हे खूप कमी प्रमाणात द्यावे. कारण या सर्व पदार्थांत फक्त मैदाच असतो.
मुलांना रोज दोन वेळा दात घासण्याची सवय लावणे आवश्यक आहे. काही गोड पदार्थ खाल्यावर त्यांना चूळ भरण्याची सवय लावावी. चॉकलेट खूप कमी प्रमाणात द्यावे. कोल्ड्रिंक्स मुलांना देऊ नयेत. त्यापेक्षा घरी बनवलेले सरबत, पन्हे हे पदार्थ द्यावेत.
मुलांना दहा तास झोपेची गरज असते. त्यांना रात्री दहा वाजता तरी झोपण्याची सवय लावावी. झोप पूर्ण झाली नाही तर मूल चिडचिडे होते, त्यांन भूक लागत नाही. मुलांनी झोपण्यापूर्वी टी.व्ही. वरील काहीना भयावह गोष्टी बघितल्या तर ती घाबरतात म्हणून मुला़ना झोपण्यापूर्वी दोन तास तरी टी.व्ही. पाहू देऊ नये. टी.व्ही. मुलांनी एक तास पाहावा. मुले टी.व्ही. बघताना आपण ही शक्यतो त्यांच्याबरोबर बसून टी.व्ही. वरील कार्यक्रम पहावा. आपण काय पाहतो त्यावर चर्चा करा. त्याला समजावून सांगा.
मुलांना राग येतो पण तो कसा व्यक्त करावा ते कळत नाही. राग नेहमी योग्य व्यक्तिपुढे, योग्य वेळीच व्यक्त करावा हे त्याला समजावून सांगा. मुलांनी केलेली एखादी गोष्ट आईला आवडली नाही तर तिने ते मला आवडले नाही असे सागांवे. मी बाबांना सांगेन असे अजिबात सांगू नये.
मुलांचा बुद्ध्यांक (I.Q. ) जेवढा महत्त्वाचा तेवढाच भावनांक (E.Q.) महत्त्वाचा आहे. त्याला भावना ओळखायला शिकवा. त्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला तर त्याला तुम्ही तसे सांगा उदा- आज तुला नवीन खेळणे आणले म्हणून तुला खूप आनंद झाला आहे. त्याला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटते, उदा - तुला बाबा रागावले किंवा तुझे आवडते खेळणे तुटले म्हणून तुला खूप वाईट वाटले ना? असे सांगा म्हणजे त्याला भावना व्यक्त करणे समजेल. त्याला चांगल्या सवयी लावा. व्यायामाची सवय लावअ. यासाठी त्याच्याबरोबर तुम्ही त्या गोष्टी करा. सूर्यनमस्कार हा कमी वेळातील सर्वांगीण व्यायाम आहे. त्याचा आत्मविश्वास वाढवा.
मूल आठ ते नऊ वर्षाचे होईपर्यंत त्याच्यातील चांगले गुणधर्म ओळखा. मुलातील एखादे चांगले कौशल्य कसे विकसित होते ते पहावे. त्यासाठी त्याला जरूर मदत करावी.’’
त्यानंतर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
बालोद्यान शिक्षिका कु. संगीता तांबे यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.